सोलापूर -: जिल्ह्यात पाणी टंचाईच्या तात्पुरत्या उपाययोजना करण्याबरोबरच पुढील शहारातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धरणात थेट  पाईपलाईन करण्याचा सर्व्हे करुन संभाव्य आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे मंत्री तथा पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिले.
     मोहोळ येथे टंचाई परिस्थितीबाबत आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री बोलत होते.
     यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील टँकरने करण्यात येत असलेल्या पाणी पुरवठ्याबाबत माहिती घेऊन याबाबतची संख्या व उपयोगितेबाबत नियमितपणे माहिती सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिका-यांना दिल्या तसेच टँकरद्वारे पिण्याचे शुध्द पाणी मिळते की नाही याची खात्री करुन याबाबत सर्व तालुक्यासाठीच्या समन्वय अधिका-यांची बैठक घेण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
     पिण्याच्या पाण्याचा आणखी दोन महिने व्यवस्थित पाणीपुरवठा करण्याबाबत विशेष लक्ष द्यावे. सध्या टँकरसाठी असलेला उदभवाचे पाणी कमी होत असल्याचे दिसून आल्यास पाणी पूर्णपणे बंद होण्याअगोदर आणखी कोठे विंधन विहिर घेऊन पाण्याच्या उदभवाचे अन्य ठिकाणे निश्चित करुन ठेवावीत अशा सूचनाही पालकमंत्री ढोबळे यांनी या बैठकीत दिल्या.
     या बैठकीत टंचाईच्या अनुषंगाने मंत्रालय स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध प्रस्तावांची व आवश्यक असलेल्या निधीची माहिती घेऊन पाठपुरावा केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
     तसेच जिल्ह्यातील तालुकानिहाय जनावरांच्या छावण्या, प्राप्त निधी आदिबाबत माहिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली. जिल्ह्यात सध्या 235 छावण्यांमध्ये 1 लाख 90 हजार 300 जनावरे दाखल असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी दिली. जिल्ह्यातील छावण्यांची मागीलप्रमाणे पुन्हा तपासणी करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
     याप्रसंगी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता एस.एन गरंडे, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे अभियंता श्री. चंदनशिवे, उप अभियंता आर.एन. पांडव, भुजल सर्वेक्षण व संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
 
Top