बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील आर.एस.एम. उद्योग समूह व भैय्यूजी महाराज सदगुरु परामार्थिक ट्रस्‍ट इंदौर यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने बार्शीत दि. 23 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्‍यात आल्‍याची माहिती राजेंद्र मिरगणे यांनी दिली.
    सद्यस्थितीत बार्शी तालुक्‍याबरोबरच उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील अवर्षणग्रस्‍त परिस्थिती व दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभूमीवर पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई आहे. विवाहासारख्‍या खर्चिक संस्‍काराने शेतक-यांना परवडणारे नसल्‍याने तसेच त्‍यांना आणखी आर्थिक भुर्दंड सहन करुन कर्जबाजारी होण्‍याची वेळ येते. याकरीता सर्व धर्म सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करयात आले आहे.
    हा विवाह सोहळा बार्शी येथील भगवंत इंजिनिअरींग कॉलेजच्‍या प्रांगणात गोरज मुहुर्तावर सायंकाळी 6 वाजता 32 मिनिट. या शुभ मुहूर्तावर होत आहे. या सामुदायिक विवाहात सहभागी होणा-या वधू-वरांसाठी सफारी, बुट, मंडोळे, शाल, शालू, चप्‍पल, चुनरी, सोन्‍याचे दोन ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र, संसारोपयोगी पाच भांगी, रंगनाथ तांब्‍या मामास टॉवेल टोपी इत्‍यादी साहित्‍य भेट देण्‍यात येणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी राष्‍ट्रसंत प.पू. उदयसिंह देशमुख (भैय्यूजी महाराज), ह.भ.प. जयवंत बोधले महाराज, ह.भ.प. औसेकर महाराज व अन्‍य संत तसेच राजकीय क्षेत्रातील विविध मान्‍यवर, मंत्री यांची उपस्थिती राहणार आहे.
    या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्‍ये सहभाग घेण्‍यासाठी इच्‍छुकांनी आर.एस.एन. हाईटस या ठिकाणी संपर्क साधावा. या कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी विविध प्रकारच्‍या 29 समित्‍या स्‍थापन करण्‍यात आल्‍या आहेत. बार्शीसह उस्‍मानाबाद, तुळजापूर, परंडा, भूम, वाशी, नळदुर्ग, कळंब, औसा, मातोळा, ढोकी, वैराग, येडशी, तेरखेडा, येरमाळा या ठिकाणी नाव नोंदणी सुरु करण्‍यात येणार आहे.
    राजेंद्र मिरगणे यांच्‍या आर.एस.एन. उद्योग समूहातर्फे आजपर्यंत शेतक-यांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्‍था, मोफत पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रे, शेती मालासाठी थेट बाजारपेठांची उपलब्‍धता, अवर्षणग्रस्‍त गावांना पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी टँकरची सोय तसेच जनावरांसाठी पानवठे, शैक्षणिक संस्‍थेतील गरीब व होतकरु मुलांसाठी विविध योजना यासारख्‍या विविध सामाजिक उपक्रमांतून समाजकारण केले आहे.
 
Top