पंढरपूर -: राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी मोहोळ तालुक्यातील पेनुर, सौंदणे, सोहाळे, वाघोली, कामती आणि कुरुल आदी गावात सुरु असलेल्या चारा छावण्यांना  शुक्रवार रोजी भेट दिली.
    यावेळी पालकमंत्री प्रा. ढोबळे यांनी तेथे उपस्थित असलेल्या पशुधन मालकांशी संवाद साधत जनावरांना चारा किती मिळतो ?  पुरेसा मिळतो का ? तसेच जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे का ?  आदी प्रश्न विचारले.    यावर उत्तर देतांना पशुधन मालकांनी 15 किलो चा-याऐवजी 20 किलो चा-याची मागणी पालकमंत्र्यांसमोर केली.
     त्यांच्या या मागणीला उत्तर देतांना पालकमंत्री म्हणाले की, आगामी कॅबिनेट बैठकीमध्ये जनावरांना अर्धा किलो पशुखाद्य ऐवजी एक किलो पशुखाद्य व चारा अनुदानासाठी साठ रुपयांऐवजी  ऐशी रुपये अनुदान करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी करु असे त्यांनी सांगितले.
      रोहयो अंतर्गत पाणंद रस्त्याचे काम संबंधित ग्रामसेवकांनी गावक-यांची बैठक बोलावून येत्या सोमवारपर्यंत सुरु करावे तसेच संबंधित ग्रामसेवकांनी ई मस्टर संकल्पना राबवावी अशी सूचना यावेळी तहसिलदार सदाशिव पडदुणे यांनी केली.
    याप्रसंगी त्यांच्या समवेत तहसिलदार सदाशिव पडदुणे, प्रकाश चवरे, रामभाऊ खांडेकर, संभाजी माने, अनिल कादे आदि उपस्थित होते.
 
Top