बार्शी  (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी-कुर्डूवाडी रोडवर खांडवीच्या व चिंकहिलच्या मध्ये असलेल्या एका धाब्‍यामध्‍ये राजरोसपणे सर्व प्रकारच्या दारुंची विनापरवाना चिक्री सुरु आहे. सदरच्या धाब्यावर नेहमीच दारु पिऊन गोंधळ व अनेक प्रकारच्या गुन्ह्याशी संबंधीत व्यक्तींचा नंगानाच सुरु असतो. सदरच्या धाबेवाल्याला हे धंदे कसे काय सुरु आहेत हे विचारल्यावर आमच्या कोणी नादाला लागत नसल्याचे तसेच आपल्याकडे सर्वयंत्रणा असून सदरच्या ठिकाणी कोणताही कर्मचारी धाड टाकण्याचे धाडस करत नसल्याचा आत्‍मविश्वास धाबेवाल्याला आहे.
    सदरच्या ठिकाणी कोणीही कोणत्याही वेळेस आल्यास आम्ही त्याला हवी ती दारुपुरवठा करु शकतो, मग तो दारु विक्रीसाठी परमीट रूम व दारुविक्री दुकानांना लागू असलेले नियम आमच्यासाठी नसतात व आम्ही 24 तास लोकांना कमी दरात दारु पुरुवतो तसेच आमच्या कृपेखाली अनेक अधिकारी असल्याने आमच्या धाब्याबर कोणी धाड टाकायला येण्या अगोदर आम्हाला फोनवर कळविले जाते. त्यामुळे आम्ही तो माल गायब करु शकतो व त्या अधिकार्‍याला काहीच हाती लागत नसल्याने आल्या पावलाने तो अधिकारी निमूटपणे परत जातो. आम्ही त्या प्रकारचे आमचे लोक वरपर्यंत ठेवले असल्याचे धाबेवाला सांगत आहे. हा केवळ धाब्यापुरता प्रश्न मर्यादित नसून या सारखे अनेक हॉटेल्स व धाबेवाले राजरोसपणे अशा प्रकारचे धंदे करत आहेत.
    सदरच्या हॉटेल व्यावसायींकाशी चर्चा केली असता, आमच्या हॉटेलमध्ये कोणत्याही प्रकारची दारु न ठेवल्यास आमच्या व्यवसायात माशा मारण्याशिवाय पर्याय नसतो तसेच आमच्या हॉटेलमध्ये आठ आठ दिवस एकही व्यक्ती फिरकत नाही. त्यामुळे हे आम्हाला नाईलाजास्तव अथवा काही रक्कम मिळत असल्याने करावे लागते. आम्हाला त्या प्रकारच्या व्यवसायासाठी लायसन काढायचे असल्यास ताबडतोब मिळत नाही तसेच काही सुट्टीचे दिवस नियमानुसार बंदच ठेवावे लागते परंतु मुळातच बेकायदा असल्यावर कसलाच कायदा आम्हाला पाळायची गरज नसते आणि नियम धाब्यावर बसवण्यासाठीच आम्ही याला धाबा असे म्हणतो असेही त्याने सांगीतले.
    कोणी पत्रकार याबाबत आपल्याला त्रास देतात का असे विचारले असता त्‍यांनी सांगितले, आमच्या नादी लागल्यावर आम्ही त्याचे हातपाय काढून त्यांना संपवू शकतो असेही त्या गुंड प्रवृत्‍तीच्या धाबेवाल्याकडून चर्चेतून सांगण्यात आले.
 

 
Top