उस्मानाबाद :- जिल्हयात सार्वत्रिक निवडणूक  येत्या 17 एप्रिल रोजी असल्याने महिला बचत गटांनी त्यांच्या परिसरातील मतदारांत मतदानाविषयी  मोठया प्रमाणात जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले .
    येथील जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात बचत गट महिलांच्या मतदार जनजागृती कार्यशाळेत ते बोलत होते. प्रसंगी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठीचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक रमेशकुमार मकाडिया, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे  प्रकल्प संचालक रुपाली सातपुते, जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ. केशव सांगळे आदि उपस्थित होते.
    जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, लोकशाही प्रक्रिया राबविण्यासाठी शासन दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करते.  प्रत्येक मतदारापोटी शासन ही गुंतवणूक या प्रक्रियेत करत असते. त्यामुळे प्रत्येक मतदाराचीही मतदान करणे ही जबाबदारी आहे. मतदान प्रक्रियेचे गांभीर्य लक्षात घेऊन मतदारांनी आपला हक्क बजावावा, असे ते म्हणाले.
    याप्रसंगी निरीक्षक श्री. मकाडिया यांनी  महिला बचत गटास मार्गदर्शन करताना महिला मंडळ,  बतच गटाच्या महिलांनी 100 टक्के मतदान होण्यासाठी मतदारात जनजागृती  करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक जिल्हा अभियान व्यवस्थापक डॉ. सांगळे यांनी केले.
 
Top