उस्मानाबाद :- 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात गुरुवार, दि. 17 एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्याअनुषंगाने निवडणूक प्रशासनाने सर्व तयारीचा आज आढावा घेतला. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी उस्मानाबादसह, तुळजापूर, उमरगा आदी ठिकाणच्या विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. मतदान केंद्रांवरील व्यवस्था, सुरक्षा आदींचाही त्यांनी आढावा घेतला.
      काही ठिकाणी मतदारांना बीएलओंकडून मतदार चिठ्टी मिळाली नसल्याच्या तक्रारी होत्या. यासंदर्भात गंभीर दखल घेऊन डॉ. नारनवरे यांनी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याबाबत विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. त्यानंतर सर्व बीएलओंना त्यांनी संबंधित मतदान केंद्रांवर उपस्थित राहून मतदार चिठ्‌ठी मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या निर्देशांनंतर सर्व सहायक निवडणूक अधिकारी, तहसीलदार यांनी तात्काळ याप्रकरणी लक्ष घालून मतदार चिठ्टी वाटपाबाबत कार्यवाही करण्यास सुरुवात केली.
        याशिवाय, विधानसभा मतदारसंघनिहाय नेमलेल्या भरारी पथके तसेच स्थिर सर्वेक्षण पथकांनी दक्ष राहण्याचे आदेश त्यांनी दिले. काही ठिकाणी स्वता भेटी देऊन त्यांनी पाहणीही केली. यावेळी अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रभोदय मुळे हे त्यांच्यासोबत होते.
        याशिवाय, सर्व मतदान कर्मचा-यांना त्यांचे ईडीसी वाटप झाले पाहिजे,  सर्व सहायक निवडणूक अधिका-यांनी त्यांच्या मुख्यालयी नियंत्रण कक्ष स्थापून सर्व माहिती वेळोवेळी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.  याशिवाय, मतदान केंद्रांच्या तयारीचा तसेच तेथील व्यवस्थेचा आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारितील सर्व मतदानकेंद्रांना मतदानाच्या दिवशी भेटी द्याव्यात, असेही सांगितले.
      प्रशासनाने संवेदनशील केंद्रावर विशेष लक्ष दिले असून कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था विस्कळित होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली असून प्रक्रियेत बाधा आणणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे डॉ. नारनवरे यांनी नमूद केले.
 
Top