उस्मानाबाद  -  ग्रामीण भागात गुणवत्ता भरपूर आहे. ही गुणवत्ता हेरुन त्याला फुलविण्याचे काम शिक्षकांनी करावे आणि सुसंस्कारित पिढी घडविण्याचा विचार पुढे न्यावा, असे आवाहन राज्याचे परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
    जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ येथील पुष्पक मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,  जि. प. उपाध्यक्ष तथा शालेय शिक्षण समिती सभापती संजय पाटील दुधगावकर, कृषी सभापती पंडित जोकार, जि.प. सदस्य सुधाकर गुंड व सुशीला कटारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य कमलादेवी आवटे, माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकीरडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी शिवाजी जाधव यांची उपस्थिती होती.
       यावेळी पालकमंत्री चव्हाण म्हणाले की, शिक्षकांचा गौरव करण्याची ही परंपरा कायम ठेवा. परिवर्तनाचे काम हे शिक्षक चांगल्या प्रकारे करु शकतात.  त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आवश्यक आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत. महिला शिक्षकांचाही गौरव व्हायला हवा, असे त्यांनी नमूद केले.
     आज विविध क्षेत्रात प्रगती होत आहे. मात्र, संवाद हरवत चालल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या शिक्षकांची अशा परिस्थितीत मोठी जबाबदारी आहे. गावोगावच्या शाळा व्यवस्थापन समित्यांनीही यासाठी सक्रीय व सकारात्मक पुढाकार घ्यायला हवा, असे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले. शिक्षकांनी त्यांच्या कामानेच आदर प्राप्त करुन घेतला पाहिजे, हे सांगताना सर्वसामान्य कष्टकरी माणूस आणि शेतकरी हेच आपले खऱ्या अर्थाने गुरु असल्याचे सांगितले.
      आमदार राजेनिंबाळकर यांनी शाळांमध्ये पायाभूत सुविधा निर्माण झाल्या असल्या तरी तेथे शिकविणारा शिक्षक हा महत्वाचा घटक असल्याचे सांगितले. शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी झाल्यास त्यांना अधिक कार्यक्षमतेने काम करता येईल.  याशिवाय, शिक्षकांनी गरीब मुलांच्या उच्च शिक्षणासाठी बॅंकामार्फत शैक्षणिक कर्जाची सोय उपलब्ध असते. त्याची माहिती करुन देण्याचे आवाहन केले.
       जि.प. अध्यक्ष डॉ. व्हट्टे यांनी देशाचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या व्यक्तिमत्वाची महती सांगितली. प्रकांड पंडित आणि खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीची पताका सर्वदूर नेण्याचे काम डॉ. राधाकृष्णन यांनी केल्याचे त्यांनी नमूद केले.
      उपाध्यक्ष श्री. दुधगावकर यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी प्राप्त परिस्थितीत अतिशय उत्तम काम केल्याचे सांगितले. गेल्या तीन वर्षात शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचा तसेच शाळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केल्याचे सांगितले.
        पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या वतीने दत्तात्रय वाघमोडे (परंडा) यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री. जाधव यांनी, जिल्हा परिषदेने शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविल्याचे नमूद केले. सेमी इंग्रजीसारखा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. आता शिक्षकांनीही शाळांतील पटसंख्या कमी होणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
 
Top