उस्मानाबाद -:  गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पीक कर्जाबाबत झालेल्या बैठकीत जिल्हयातील बँकांनी व महामंडाळांनी केलेल्या कर्ज वितरणचा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आढावा घेतला.
    यावेळी अपर जिल्हाधिकारी जे. टी.पाटील, बँकेचे व्यवस्थापक, प्रतिनिधी, महामंडळाचे अधिकारी,  विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
    प्रथम जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी प्रत्येक महामंडळांचा कर्ज प्रकरणांचा आढावा घेतला व जास्तीत जास्त प्रकरणे करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. महामंडळांनी फक्त नेमुन दिलेली  उद्दिष्ट पुर्ण न करता त्यापेक्षाही जास्त उद्दिष्ट साध्य करण्यास त्यांनी सांगीतले. बँकांनी  100 टक्के कर्ज वाटप करावे तसेच त्या कर्जावर जास्त व्याजदर आकारु नये, ज्या कर्जाच्या व्याजावर निर्बंध आहेत त्याचा स्पष्ट उल्लेख करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.
    कर्जदाराकडून जास्त कर्ज व्याजाची वसुली झाल्याचे स्पष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच बॅंकांनी त्यांच्याकडे येणारा प्रत्येक रिपोर्ट तपासून पाहावा असेही त्यांनी सांगीतले. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज मंजुरीसाठी कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये. त्यामुळे वेळेत कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास किंवा एखादी दुर्दैवी घटना घडल्यास संबंधित बँकांवर कार्यवाही करण्याचा इशारा त्यांनी दिला. श्‍या
    प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये महाऑनलाईन सुविधेचा वापर करावा. त्या वरुनच बँकींग करावे. तेथे बँकेचा एक प्रतिनिधी नेमावा म्हणजे प्रत्येक गावकऱ्याला आपल्या गावातूनच आपले खाते बँकेत उघडता येईल व व्यवहारही गावातूनच करता येईल असेही त्यांनी सांगीतले.
    विधानसभा निवडणुकीसंदर्भात यावेळी त्यांनी बॅंकांना सूचना दिल्या. निवडणूक कालावधीत जास्तीची रोकड रक्कम अथवा किंमती वस्तू जवळ बाळगु नयेत. संबंधित रक्कम ही योग्य कागदपत्रांसह जवळ बाळगावी. अन्यथा ती जप्त केली जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
    यावेळी अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांनीही महामंडळ व बँक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
    यावेळी जिल्हाधिकारी डॉ.नारनवरे यांनी सर्व उपस्थितांना मतदान करण्याविषयी व सार्वजनिक स्वच्छतेविषयी सर्वांना शपथ दिली.
 
Top