बार्शी (मल्‍लीकार्जून धारूरकर)  मागील अनेक निवडणुकांच्या अभ्यासावरुन व नियमित गुन्ह्यांच्या नोंदीवरुन बार्शी हे संवेदनशील मतदारसंघ म्हणून याअगोदरच घोषित केलेला मतदारसंघ आहे. बार्शी विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये व पुन्हा शिवसेनेत दाखल झालेले राजेंद्र राऊत तर राष्ट्रवादीचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री दिलीप सोपल यांच्यामध्ये तुल्यबळ लढत आहे. याशिवाय भाजपाचे राजेंद्र मिरगणे व कॉंग्रेसचे सुधीर गाढवे हे देखिल निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. बार्शी मतदारसंघातील मतदान मशिनरी हॅक केल्याच्या अफवांमुळे बार्शीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
       बार्शी तालुक्यातील मतदान केंद्राजवळ फिरता संगणक (लॅबटॉप) वापरुन मतदारांच्या नावांची तपासणी करणार्‍या तरुणांना शिवसेनेचे उमेदवार राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी उचलबांगडी करुन मारहाण करत बार्शीतील तहसिल कार्यालयात आणले. मतदान संपत आल्यावर दुपारी पाचच्या नंतर सदरचा प्रकार घडला. यावेळी राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या समक्ष तरुणांकडून हस्तगत केलेले लॅबटॉप इत्यादी साहित्य निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या समोर ठेवून बार्शी तालुक्यात हे तरुण मतदानयंत्रे या संगणकावरुन हाताळत असल्याचा संशय व्यक्त करुन सर्व ठिकाणी आम्हाला मिळणारी मते विरोधकांना जात असल्याचे सांगून मोठा गोंधळ केला. यावेळी शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत, त्यांचे सहकारी पट्टम पवार, भाऊसाहेब आंधळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने तहसिल कार्यालयाजवळ जमा झाले. तोपर्यंत सदरची वार्ता कार्यकर्त्यांमार्फत संपूर्ण तालुक्यात पसरली व अशा प्रकारचे तरुण हे संगणकावरुन मतदान मशिन हाताळून विरोधकांना फायदा करुन देत असल्याचे सांगण्यात येत होते. सदरच्या गोंधळामुळे गावोगावी छोटा संगणक (लॅबटॉप) घेऊन बसलेल्या तरुणांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करुन बार्शीकडे पाठविण्यात येत होते. काही वेळात बार्शी तहसिलच्या आवारात सुमारे ८० तरुण संगणकांसह धरपकड करुन आणले होते. पोलिसांनी सदरच्या तरुणांना विचारणा केली असता मतदान केंद्राच्या आवाक्यातील असलेल्या मतदारांची नावे शोधण्यासाठी आम्हाला मानधनावर खाजगी व्यक्तीमार्फत नेमण्यात आल्याचे सांगण्यात आले. सदरच्या तरुणांना खाजगी वाहनांनी सकाळी एकएक गावात सोडून पुन्हा सायंकाळी नेण्यासाठी वाहने येणार होती. अनेक तरुणांचे कपडे फाडून मारहाण करण्यात आली होती. कार्यकर्त्यांच्या संभ्रमामुळे संपूर्ण तालुक्यातील वातावरण तणावाचे निर्माण झाले होते. सदरच्या तरुणांकडील जप्त केलेल्या लॅबटॉपमधील काही लॅबटॉप आम्ही आमच्याकडे घेऊन जाणार आहोत असेही राऊत यांच्या कार्यकर्त्यांनी सांगीतले. सदरचे तरुण हे खेड्यापाड्यात बर्‍याच ठिकाणी एकाकी बसले होते. काही तरुण हे कोणाच्यातरी घरात बसले होते, लॅबटॉपला चार्जिंग करण्यासाठी त्याठिकाणी बसावे लागल्याचे काहींनी सांगीतले. अनेक ठिकाणच्या ग्रामीण अशिक्षीत मतदारांना लॅपटॉपवरुन इंटरनेटच्या सहाय्याने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरुन मतदारांचे क्रमांक, मतदान केंद्र इत्यादी माहिती मिळत असल्याची कल्पनाही नाही. केवळ फोनद्वारे मिळणार्‍या अफवांमुळे असे प्रकार घडल्याची शक्यता आहे.
सदरच्या घटनेबाबत निवडणुक निर्णय अधिकारी यांनी बोलतांना मतदान करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या मशिनरीला कोणत्याही प्रकारे इतर संगणकावरुन हाताळण्यासाठी उपकरण नसते. अशा प्रकारे कोणालाही मतदान केंद्रातील मशिनची हाताळणी करता येत नाही. सदरच्या घटनेबाबत आपल्याकडे अद्याप कोणीही लेखी तक्रार दिली नाही. पोलिस हे सदरच्या घटनेची नोंद घेऊन याचा अहवाल देतील. यावेळी ते तरुण कोणाकडून सांगीतले होते व त्यांना किती खर्च व त्यांची नावे इत्यादी माहिती तपासानंतर स्पष्ट होईल. कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणताही जमाव जमवून अनुचित प्रकार करण्याचा प्रकार केल्यास पोलिस त्यांचे काम करतील असेही यावेळी सांगण्यात आले.
यापूर्वीच्या सन १९९९ च्या निवडणुकीतही शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादीचे दिलीप सोपल यांच्यामध्ये लढत झाली होती यावेळीही निवडणुकीच्या मतपेट्या पळविल्या व बदलल्याच्या अफवा सुटल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते याची पोलिस व निवडणुक दफ्तरी नोंद आहे.
 
Top