धरमशाला : चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर ५९ धावांनी विजय मिळविला. या विजयासह भारताने ही मालिका २-१ ने जिंकली. विजयासाठी भारताने विंडीजसमोर ३३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते परंतु, वेस्ट इंडिजचा डाव २७१ धावांवर संपुष्टात आला. दुसरीकडे मानधनाच्या मुद्यावरुन वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू आणि बोर्डात वाद झाल्याने वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने उर्वरित दौरा रद्द केला.
    नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने ६ बाद ३३० धावांपर्यंत मजल मारली. बर्‍याच महिन्यांपासून फॉर्मसाठी चाचपडणार्‍या विराट कोहलीने या सामन्यात १२७ धावा केल्या. भारताच्या ७० धावा झालेल्या असताना शिखर धवनच्या रुपात वेस्टइंडिजला पहिले यश मिळाले. अँड्रयू रसेलच्या गोलंदाजीवर धवन बाद झाला. त्याने ३५ चेंडूत ३५ धावा केल्या. त्यानंतर अजिंक्य रहाणे अर्धशतक झळकवून बाद झाला. त्याने ७९ चेंडूत ६८ धावा केल्या. अर्धशतकी खेळीत त्याने सात चौकार लगावले. बेनने त्याला पायचीत केले दुसर्‍या सामन्यातील आपल्या खेळीचा लय कायम राखत विराट कोहलीने १२७ धावा तडकावल्या. यात त्याने तीन षटकार आणि १३ चौकार लगावले. त्याला दुसर्‍या बाजूने सुरेश रैनानेही चांगली साथ दिली. रैनाने ५८ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली. त्यांच्या या मजबूत खेळीमुळे भारताने त्रिशतकी अकडा पार केला.भारताच्या धावसंख्येचा पाठलाग करताना विडिंजचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. सॅम्युल्सची ११२ धावांची शतकी खेळी वाया गेली. अन्य फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहोम्मद शामी, अक्षर पटेल आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. मानधानाच्या मुद्द्यावरुन झालेल्या वादामुळे वेस्ट इंडिज संघाने भारत दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजचा भारत दौर्‍यातील आजचा सामना शेवटचा ठरला. या दौर्‍यातील नियोजित एक एकदिवसीय सामना, एक टी-२० आणि तीन कसोटी सामने होणार नाहीत.
 
Top