तुळजापूर - तिर्थक्षेत्राकडे धार्मिक आणि पर्यटन या दोन्ही बाजूने पाहिले तरच विकास होवू शकतो,तो विकास फक्त भाजपच करू शकतो,असे सांगुन  महाराष्‍ट्रात भारतीय जनता पार्टीला  पुर्ण बहुमत मिळेल असा आत्‍मविश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुळजापूर येथे रविवार दि. 12 आक्‍टोबर रोजी झालेल्‍या सभेत बोलताना व्‍यक्‍त केले.
    तुळजापूर येथे विधानसभा निवडणुकीतील  भाजप उमेदवारांच्या प्रचारानिमित्‍त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी दुपारी सभा झाली. यावेळी ते बोलताना पुढे म्‍हणाले की, तुळजापूर हे तिर्थक्षेत्र असून,तुळजापूर रेल्वेने जोडण्याची मागणी गेल्‍या अनेक वर्षापासुन होत आहे.मात्र सत्‍ताधा-यानी हे काम केले नाही.हे शुभकाम आपल्या हातून होण्याची आई तुळजाभवानीची इच्छा असल्याचे सांगून तुळजापूर रेल्वेचा प्रश्‍न मार्गी लावण्‍याचे सुतोवाच केले . तर मोदी म्हणाले, की महाराष्ट्रात दरवर्षी ३७०० शेतकरी आत्महत्या करतात. त्यामुळे तेवढ्याच महिला विधवा होतात, कोणाला वडील गमवावे लागतात, कोणाला मुलगा गमावण्याची वेळ येते; पण कॉंग्रेस-आघाडी सरकारच्या पोटातले पाणी हलत नाही आणि त्यांच्या डोळ्यातही पाणी येऊ शकत नाही. महाराष्ट्रातील शेतक-यांची ही दुर्दशा करून ठेवल्‍याचे त्‍यांनी आरोप केले. आता महाराष्ट्र वाचवायचा असेल, तर जागे व्हा, आताच निर्णय घ्या आणि नव्या पिढीलाही वाचवा.
  आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतक-यांना पाण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नदीजोड प्रकल्प हाती घेत आहोत. शेतक-यांची स्वप्ने तीच आमची स्वप्ने, असे मानून जे काही करता येईल ते करत आहोत, असेही मोदी म्हणाले.नरेंद्र मोदी आपल्या भाषणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली पण शिवसेनेच्या विरोधात चकारही शब्द बोलले नाही. यावेळी व्यासपीठावर उमेदवार संजय निंबाळकर,संजय दुधगावकर,कैलास शिंदे,पाशा पटेल,बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, सुजितसिंह ठाकूर, जिल्‍हाध्‍यक्ष नितीन काळे, भिमाशंकर हासुरे यांच्‍यासह अनेक मान्‍यवर उपस्थित होते. या सभेसाठी जिल्‍ह्यासह शेजारील जिल्‍हयाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्‍येनी उपस्थित होते.
 
Top