पांगरी(गणेश गोडसे) कारी ता.येथील प्रवाशांना ऊन,वारा,पाऊस या तिन्ही संकटाचा सामना करत एस.टी.बस मधून जीव मुठीत घेऊन  प्रवास करावा लागत असून वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष केंद्रीत करून या मार्गावर सुस्थितीतील बसेस सोडाव्यात अशी या मार्गावरील नियमित प्रवाश्यांची मागणी आहे.
 याबाबत अधिक माहिती अशी की बार्शी-कारी या मार्गावर फेर्‍या करणारी बस दररोज एकच असून या मार्गावर दैनंदिन मोडकळीस आलेली,खिडक्यांना काचाच  नसलेली,टफ हेलकावे खाणारी,बसमध्ये कर्ण कर्कश आवाज येणारी अशी बस परिवहन महामंडळातर्फे या मार्गावर सोडली जाते.नादुरुस्त स्वरुपातील बस या मार्गावरून वाहत असल्यामुळे व बस रस्त्यातच बंद पडत असल्यामुळे येथून शिक्षणासाठी पांगरी,बार्शी येथे जाणार्‍या विद्यार्थ्यांची,प्रवाश्यांची व नौकरदारांची मोठी गैरसोय होते.कित्येकदा विद्यारर्थ्यांना रस्त्यातच शाळा भरवावी लागते.
   कारी बार्शी बस प्रवासाचा अनुभव कांही विलक्षण असाच ठरत असून तुटलेले बाकडे,त्यावर कुशनचा अभाव,त्यात पुन्हा बस बार्शीत पोचेलच याची नसलेली हमी,चालक,वाहकालाही कसरत करत करावे लागणारे काम आदीमुळे बार्शी आगाराचा कारभार चव्हाट्यावर येत आहे.
  बार्शी आगाराच्या कारभारामुळे या मार्गावरील अवैध प्रवाशी वाहतूक बोकाळत असून प्रवाशीही खराब बसेस मुळे महामंडळाकडे पाठ फिरवत आहेत.परिणामी याचा महामंडळालाच तोटा सहन करावा लागत आहे.जनतेच्या सेवेसाठी हे ब्रीद सत्यात उतरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने याकडे लक्ष केंद्रीत करून या मार्गावर सुस्थितीतिल बसेस सोडून प्रवाशी वाढवा मोहीम यशस्वी करावी अशी प्रवाश्यांची मागणी आहे.
 
Top