उस्मानाबाद -  जागतिकीकरणामुळे बदलेल्या परिस्थितीत सामाजिक व्यवस्था टिकविण्याची महत्वाची जबाबदारी प्रसारमाध्यमांवर आहे. अशावेळी सार्वजनिक कामकाजात पारदर्शकतेचा आग्रह धरताना सामाजिक बांधिलकी  ठेवून विविध विषयाचा प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी सखोल अभ्यास करावा आणि तो  विषय समाजापुढे मांडावा, असे मनोगत जिल्हा कोषागार  अधिकारी राहुल कदम यांनी व्यक्त केले.
    येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून  सार्वजनिक कामकाज पारदर्शकता- माध्यमांची भूमिका या विषयावर श्री. कदम यांचे विशेष व्याख्यान आयोजित  करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांच्यासह उस्मानाबाद येथील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधींची मोठया संख्येने उपस्थिती  होती.
    यावेळी श्री. कदम यांनी सामाजिक व्यवस्थेवर आणि बदलत्या घडामोडींचा वेध घेत सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले की, समाज आणि वृत्तपत्रांचे नाते उच्च दर्जाचे आहे. समाजामध्ये क्रांती घडवावयाची ताकद वृत्तपत्रामध्ये आहे. आणीबाणीच्या वेळी वृत्तपत्रांनी हा बाणेदारपणा दाखविला.  त्यामुळे वृत्तपत्रांनी स्वतंत्रता जपली आहे.  जागतिकीकरणामुळे स्पर्धात्मकता वाढली आहे. अतिशय वेगवान असे बदल घडत आहेत. अशावेळी वाचकांपर्यंत बातमी कमी वेळेत उपलब्ध करुन देणे आणि विश्वासार्हता जपणे हे आव्हान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
    माहितीचे वहन, जनमत तयार करणे, मनोरंजन आणि जाहिरात अशा माध्यमातून वृत्तपत्रांनी त्यांची भूमिका तयार करण्याचे काम केले आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे अभ्यासपूर्ण आणि सर्व घटकांचा विचार करुन त्याचे चित्रण वर्तमानपत्राच्या द्वारे मांडणे महत्वाचे बनल्याचे सांगून श्री. कदम म्हणाले की, त्यामुळेच आजच्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींची जबाबदारी अधिक वाढली आहे. छापील बातम्यांवर आजही लोकांचा विश्वास असल्याने एखाद्या घटनेला विधायक वळण देण्याची त्यांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी एखादी घटना मांडताना त्याचा चिकित्सक अभ्यास करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. चव्हाण यांनी श्री. कदम आणि प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने स्वागत केले. राष्ट्रीय पत्रकार दिन आयोजनामागील भूमिका श्री. चव्हाण यांनी प्रास्ताविकात सांगितली.
    श्री. अशोक माळगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर आभार मकरंद नातू यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी जिल्हा माहिती कार्यालयातील सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.     जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हा हिवताप कार्यालय यांचेही यावेळी सहकार्य लाभले. 
 
Top