उस्मानाबाद - जिल्हयात पाणी, आणेवारी, चारा टंचाई व आरोग्य विषयक प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ प्राधान्य देण्यात येईल, यासाठी सर्व यंत्रणांनी आपल्याकडील निधीची मागणी व प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आवाहन खासदार रविंद्र गायकवाड यांनी केले.
        येथील जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई संदर्भात आढावा बैठकीत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी वरील आवाहन केले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.टी.उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस.घुगे, ग्रामीण पाणी पुरवठयाचे कार्यकारी अभियंता श्री.चाटे, उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह विविध यंत्रणेचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
              खासदार श्री. गायकवाड म्हणाले की,  आगामी काळात पाऊस नाही पडला तर जिल्हयाला पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चाऱ्यांची कमतरता पडू नये, यासाठी आराखडा तयार करुन निधीची मागणी नोंदवावी, याबाबींना प्राधान्य देण्यात येईल. पशुपालकांनी आपले जनावरे छावणीत सोडावीत यासाठीही जनजागृती करण्याची गरज आहे. जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारती व रस्ते विषयक माहिती घेऊन निधीची मागणी नोंदविणे. वीजेच्या बाबतीत समन्वयाने मार्ग काढण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्राणेला दिले. यावेळी श्री.गायकवाड यांनी विभागनिहाय आढावा घेऊन अडचणी जाणून घेतल्या.
            श्री.पाटील म्हणाले की, पुढील काळात होऊ घातलेल्या बैठकीच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाने आपल्या स्तरावरील माहिती सादर करावी.कृषि व पशुसंवर्धन विभागाने चाऱ्यांचे नियोजन करण्यासाठी आराखडा तयार करण्याची निर्देश दिले. प्रलंबित कामांबाबत आढावा घेऊन त्यावर उपाययोजनांची माहितीही तात्काळ सादर करावी. अपूर्ण सिंचन योजना तात्काळ पूर्ण कराव्यात. विभागाकडे विशेष कार्यक्रम असतील तर त्यांच्या छायाचित्रासह माहिती सादर करावी, असे निर्देश श्री. पाटील यांनी दिले. या   बैठकीचे प्रास्ताविक व आभार श्री.तांबे यांनी  मानले.
 
Top