उस्मानाबाद - ग्रामीण अर्थव्यवस्था कृषिवर आधारित असून दिवसेंदिवस शेती कामासाठी शासनाकडून कृषी औजारे, उपकरणे,सयंत्राचा वापर मोठया प्रमाणात केला जातो, यासाठी  चांगल्या शेतीगटाला शेती विषयक औजारे वितरणाचे काम द्यावे, प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी यांनी केले.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या त्यांच्या दालनात राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञानातंर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान आणि टंचाईमुक्त महाराष्ट्र -2019 जलयुक्त शिवार अभियानाची बैठक त्यांच्या  अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
    या बैठकीस जिल्हा कृषी अधिकारी शंकर तोटावार, ल.पा.जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता द.ल.कोरे, आत्माचे अतिरिक्त प्रकल्प व्यवस्थापक  डी.व्ही. जाधवर, कृषी विकास मंच अध्यक्ष डी.सी.राठोड, जि.प. ल.पा. उप कार्यकारी अभियंता व्ही.के.शेंद्रे, अग्रणी बँकेचे बी.आर.दुपारगुडे, यांत्रिकी विभागाचे बी.आर.पवार, तंत्र अधिकारी एस.बी.पटवारी यांची उपस्थिती होती.
    या बैठकीत कृषी औजारे, उपकरणांवर अनुदान पुरवठा, भाडे तत्वावर कृषी औजारे, उपकरणांची सेवा पुरविण्यासाठी औजारे बँक स्थापन करणे, उच्च तंत्रज्ञानावर आधारित अधिक उत्पादकतेसाठी सेवा सुविधा केंद्राची उभारणी, स्थानिक पुढाकाराच्या बाबींसाठी सुविधा तसेच याबाबत जाहिरात प्रसिध्दीस देणे, जिल्हास्तरीय समितीची स्थापना करणे याबाबत चर्चा करण्यात आली.
    यावेळी श्री.पाटील म्हणाले की, जिल्ह्यात सर्वांसाठी पाणी -टंचाईमुक्त महाराष्ट्र-2019 अंतर्गत पाण्याचा टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी सोय व्हावी यासाठी शासन निर्णयात नमूद बाबींचा सर्व संबंधित विभागांनी आराखडा तयार करावा.आपल्या शेतीतील बोर,विहीरींचे पुरर्भरण, जलसंधारणात नाल्यांचे खोलीकरण, माझ शेत माझं पाणी, अशी  शेतकऱ्यांची चळवळ उभारली तरच पिण्याच्या पाण्याचा व विकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.
    या बैठकीत जलयुक्त शिवार अभियानाची ही पहिलीच बैठक असून पाणलोट विकास, सिमेंट बंधारे, नाला रुंदीकरण व खोलीकरण, जुन्या जलसंरचनांचे पुनर्जिवन, के.टी.वेटर/साठवण बंधारा दुरुस्ती, पाझर /सिंचन तलावांची दुरुस्ती, नुतनीकरण व क्षमता पुर्नस्थापित करणे, तलाव -नाला बांधातील गाळ काढणे, मध्यम व मोठया प्रकल्पांची सिंचन क्षमतेनुसार वापर होण्यासाठी उपाययोजना करणे, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, पाण्याचे स्त्रोत बळकट करणे आणि कालवा दुरुस्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
     श्री.तोटावार यांनी जलयुक्त  शिवार अभियान यशस्वी राबविण्यासाठी शासनाकडून प्राप्त झालेल्या शासन निर्णयांचे वाचन केले. सर्व संबंधित विभागांनी आपल्या अधिनस्त असलेल्या कामांचे सर्वेक्षण करुन गावनिहाय आराखडा तयार करण्याबाबत संबंधित विभागांना सांगितले.
           या बैठकीस कृषी विभाग व या संबंधित अधिकारी  व कर्मचारी उपस्थित होते.                               
 
Top