बार्शी,- मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या बार्शी शहरातील व्यापार्‍यांचे गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी तसेच शेतकर्‍यांच्या शेतमालाला चांगली किंमत मिळवून देण्यासाठी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी लातूर रस्त्यावरील ३० एकरच्या विस्तीर्ण जागेवर लक्ष्मी सोपान कृषि उत्पन्न बाजार समिती ही स्थापन केली आहे.        
       यात कडधान्ये, तेलबिया, शेतीमाल, फळांचा बाजार, कडबा बाजार, जनावरांचा बाजार इत्यादी सर्व प्रकारच्या मालासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण क्षेत्राला कुंपन भिंत तसेच अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण झाले असून लिलाव शेड, वजन काटा, गोदामे, व्यापारी गाळे, विजेची व्यवस्था, पिण्याचे व जनावरांच्या पाणीची सुविधा हमाल व शेतकरी निवास इत्यादी प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. बाजार समितीमध्ये धान्य स्वच्छ करण्याच्या ३ मशिन, वजनकाटा इत्यादी सर्व सुविधांनी शेतकर्‍यांच्या मालाला जादा दर मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकर्‍यांसाठी माती परीक्षण, पाणी परीक्षण यांच्या प्रयोगशाळा,ज्या शेतीमालाची आवक करावी लागते तो शेतीमाल आपल्या तालुक्यातच उत्पादन घेऊन त्याची इतर बाजारपेठेत निर्यात करण्याची सुविधा. चांगल्या दर्जाच्या शेती उत्पादनाला बाहेरील राज्यात व देशात निर्यात करण्यासाठी परवान्याचे काम प्रगतीपथावर आहे. शेती मालावरील विविध प्रकारच्या प्रक्रिया व साठवण क्षमतेसाठी विविध गोदामांची सोय करण्यात येत आहे. शासकिय अनुदानातून गोदाम निर्मीतीसाठी शासकिय बँकेतून विशेष अर्थसहाय्य, गोदामात ठेवलेल्या मालावर उचल आदींची सुविधा करण्यात येत आहे.
     
    लक्ष्मी सोपान कृषि उत्पन्न बाजार समितीचे शनिवारी उद्घाटन होत असून बँक ऑफ महाराष्ट्रचे विभागीय व्यवस्थापक जी.व्ही.रमणा यांचे अध्यक्षतेखाली, राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांचे शुभहस्ते, राज्याचे साखर संचाालक डॉ.किशोर तोष्णीवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास खासदार रविंद्र गायकवाड, माजी आमदार ओमराजे निंबाळकर, भैरवनाथ शुगर्सचे चेअरमन तानाजी सावंत, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, बाळासाहेब शेळके, शिवशक्ती बँकेचे चेअरमन डॉ.प्रकाश बुरगुटे, उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन विश्वास शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
    या कार्यक्रमास भूम, परांडा, कळंब, वाशी, धाराशिव (उस्मानाबाद), तुळजापूर, माढा आदी तालुक्यांतून शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत. बार्शी शहर व तालुक्यातील व्यापारी बंधू व शेतकरी बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केले आहे.



 
Top