बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :- बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंताच्या जयंतीनिमित्त होणार्‍या उत्सवाचे औचित्य साधून या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात विविध पाळीव प्राण्यांची खरेदी विक्री द्वारे पशूधनाची मोठी उलाढाल होईल अशी माहिती शिवसेनेचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. 
         राऊत म्हणाले, बार्शीचे गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे याकरिता विविध प्रकारच्या व्यापारातील विश्वास निर्माण करण्याचे काम हाती घेतले. अनेकांना रोजगार, बाजारपेठेतील अनेक व्यवसायांची वृध्दी, शेतकर्‍यांच्या मालाला चांगला भाव, शेती पूरक विविध उत्पादनांचे उद्योग, मोठ्या बाजारपेठांशी व उद्योग व्यावसायिकांशी संपर्क करुन उपलब्ध मालाची चांगल्या दरात विक्री, शेतकर्‍यांना मिळणार्‍या रकमेची हमी, शेतीमालासाठी गोदामांची निर्मिती, कर्जाची उपलब्धता, याचाच एक भाग म्हणून खाजगी कृषि उत्पन्न बाजार समिती सुरु केली आहे. याची सुरुवात झाल्यापासून बार्शीच्या बाजारसमितीमध्ये आजूबाजूच्या तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी व मालाची खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. व्यापारी व शेतकर्‍यांना आपण प्रत्यक्ष मार्गदर्शन करत असतांना आज अठरा अठरा तास स्वत: काम करुन कोणाला कसलीही अडचण येऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहे. बाजार समितीमध्ये मालाची मोठ्या प्रमाणात आवक जावक सुरु झाल्यामुळे वाहन चालकांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहेत. शेतीमालासह पशूधनाचाही बाजार चांगल्या रितीने सुरु झाला असून मोठ्या संख्येने जनावरांची खरेदी विक्री होत आहे. आगामी काळात आजपर्यंत झाले नसलेल्या केळी, लिंबू, द्राक्षे, बोर आदींचे लिलावही बाजारसमिती मार्फत करण्यात येतील. सोलापूर येथील गड्डा यात्रेत, अकलूज येथे, पंढरपूर येथील यात्रेत होत असलेल्या जनावरांच्या उलाढालीप्रमाणे बार्शीत देखिल भगवंत प्रकट दिनाचे औचित्य साधून आठवडाभर गाय, बैल, घोडा, बोकड, शेळी आदी जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरविण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याचेही राऊत यांनी यावेळी सांगीतले.

 
Top