उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने दि. 2 ते 4 मार्च, 2015 या कालावधीत सांस्कृतिक सभागृह, आनंदनगर, उस्मानाबाद येथे ग्रंथोत्सव-2015 या ग्रंथप्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उस्मानाबाद येथील सांस्कृतिक सभागृह आनंदनगर येथे सलग तीन दिवस हा कार्यक्रम सुरु राहणार आहे.  दि. 2 मार्च  ते 4 मार्च रोजी होणाऱ्या या उपक्रमात मराठवाड्यासह, सोलापूर, पुणे आणि मुंबई येथील ग्रंथ प्रकाशकांचा सहभाग राहणार आहे. त्याचबरोबर शासकीय ग्रंथागार, औरंगाबाद यांचा शासकीय प्रकाशनांचा स्टॉल याठिकाणी असणार आहे.
या उपक्रमास मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा, नगरवाचनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, आकाशवाणी आणि जिल्हयातील सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे सहकार्य लाभले आहे. 
दि. 2 मार्च रोजी सकाळी 8 वाजता साहित्य जागर दिंडीने या उपक्रमाला सुरुवात होईल. विविध शाळा महविद्यालयातून ही साहित्य जागर दिंडी निघणार असून यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रा.प महाविद्यालय, व्यंकटेश महाजन महाविद्यालय, छत्रपती शिवाजी हायस्कूल, श्रीपतराव भोसले हायस्कूल, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), सरस्वती महाविद्यालय आणि तेरणा महाविद्यालय येथून ही साहित्य जागर दिंडी निघणार आहे. सकाळी 10 वाजता ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या हस्ते महोत्सव स्थळी ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. तर सायंकाळी 5 ते 6-30 या वेळेत जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांचे आजचा युवक, अवांतर वाचन आणि स्पर्धा परीक्षा या विषयावर व्याख्यान होणार आहे.
पहिल्या दिवशी सायंकाळचे सत्र (सायं 7 ते रात्री 9-30) निमंत्रित कवींच्या कवितांनी रंगणार आहे. जिल्ह्यातील मान्यवर कवींचा यात सहभाग असणार आहे.  यात डी. के. शेख,  शेखर गिरी, प्रा. भारत हांडिबाग, अॅड. मुकुंद सस्ते, सुधीर कुलकर्णी, शंकर मुगळे, शिवराज मेनकुदळे, देविदास पाटील, अर्चना बावीकर, प्रा. बाळ पाटील, पंडीत कांबळे, रुपेशकुमार जावळे, बाळ जमाले, अपर्णा चौधरी, हरिपाल मोरे, वंदना कुलकर्णी, बाळू घेवारे, पोपट माळी, दीपक खरात, रमेश बोर्डेकर, हणमंत पडवळ, अभिमन्यू इंगळे, प्रा. हनुमंत काळे, सचिन क्षीरसागर, कमलाकर भोसले, गजानन मुळे, स्वप्नाली अत्रे, विशाल वाघमारे, आनंद वीर, सतीश मडके,  शंकर कसबे, विजय परदेशी, मनीषा बडे, युवराज नळे, रेखा ढगे, मधुकर हुजरे यात सहभाग होणार असून ॲड. राज कुलकर्णी आणि भाग्यश्री वाघमारे या काव्यसंध्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणार आहेत.
दि. 3 मार्च रोजी सकाळी  11 वाजता जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सत्कार प्रख्यात लेखक प्रा. मिलींद जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यात वेदकुमार वेदालंकार, योगीराज वाघमारे, अॅड. वा.मा. वाघमारे, श.मा. पाटील, भारत गजेंद्रगडकर, उत्तम लोकरे,  तु.दा. गंगावणे, बाबुराव कांबळे, गोविंद मैदरकर,  के. व्ही. सरवदे, शिवमूर्ती भांडेकर, भाऊराव सोमवंशी,  जयराज खुने, माधव गरड, राजेंद्र अत्रे, भ. ना. कदम, के. बी. सूर्यवंशी, सुभाष चव्हाण, शहाजी कांबळे आणि ज्ञानेश्वर ढावरे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अॅड. कुलदीप (धीरज) पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. 
त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजता बळीराजाच्या कविता हा शेतकऱ्यांची जीवनकहाणी शब्दातून मांडणाऱ्या विशेष काव्यमैफिलीचा कार्यक्रम होणार आहे. मराठवाड्यातील बालाजी इंगळे, प्रमोद माने, शंकर वाडीवाले, चंद्रशेखर मलकमपट्टे,  प्रा. ललित अधाने, अरुण पवार, प्रा. अरविंद हंगरगेकर, अंबादास केदार, किसन घारुळे आणि रवींद्र केसकर हे नामवंत कवी यात सहभाग घेणार आहेत.  
दि. 4 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा राजकारणापलीकडचे व्यक्तीमत्व उलगडणारा दिलखुलास संवाद कार्यक्रम होणार आहे. यात ज्येष्ठ आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार राणा जगजीतसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह औरंगाबाद शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे आणि पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे.
ग्रंथोत्सवात तीनही दिवस सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत ग्रंथप्रदर्शन रसिक वाचकांसाठी खुले राहणार असून जिल्ह्यातील रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय, उस्मानाबादच्या वतीने करण्यात आले आहे.  

 
Top