उस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सध्या 65 शिक्षक अतिरिक्त असल्याने आणि सन 2014-15 ची संच मान्यता उपलब्ध नसल्यामुळे सद्यस्थितीत उपोषणकर्त्या 44 निम शिक्षकांना सेवेत सामावून घेणे शक्य नाही. त्यामुळे सदर शिक्षकांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे.  अन्यथा उपोषणामुळे निर्माण होणा-या परिस्थितीस जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे  आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
   उस्मानाबाद जिल्हा परिषदेतंर्गत 44 निम शिक्षकांना प्राथमिक शिक्षक म्हणून आदेश न मिळाल्याने दिनांक 16 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हरिश्चंद्र होगले व अन्य निम शिक्षकांनी उपोषण सुरु केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी हे आवाहन केले आहे. यासंदर्भातील वस्तुस्थिती प्रत्यक्ष उपोषणकर्त्यांना भेटून सांगितली असून सद्यस्थितीत सन 2013-14 च्या शिक्षक संच मान्यतेनुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे 65 शिक्षक अतिरिक्त आहेत. त्यामुळे संबंधित 44 निम शिक्षकांना सेवेत सामावून घेणे सद्यस्थितीत शक्य नाही तसेच सन 2014-15 या शैक्षणिक वर्षाची शिक्षक संच मान्यता अद्याप झालेली नाही. त्यामुळे संबंधीत उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला वेठीस न धरता आमरण उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 
वस्तुस्थिती स्पष्ट करुनही सदर उपोषण सुरुच ठेवल्यास आणि दरम्यानच्या कालावधीत काही अनर्थ घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत शिक्षकांची राहील, असेही शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी या पत्रकात नमूद केले आहे.      

 
Top