उस्मानाबाद -  संत साहित्याचे गाढे अभ्यासक, अभंगांच्या माध्यमातून साहित्याची पताका देशभर घेवून फिरणारे संत नामदेव यांची कर्मभूमी असलेल्या घुमान (पंजाब) येथे ३ ते ५ एप्रिलदरम्यान होणार्‍या ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या पुढाकाराने उस्मानाबादेतून दोनशे साहित्यप्रेमी रवाना झाले आहेत. उस्मानाबाद आगारातून तीन बसगाड्या
सायंकाळी ४ वाजता नाशिककडे रवाना झाल्या. तेथून बुधवारी पहाटे ५ वाजता रेल्वेने ते घुमानकडे मार्गस्थ होत आहेत. दरम्यान घुमानवारी करणार्‍या सर्व साहित्यप्रेमींना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
        घुमानला निघालेल्या साहित्यप्रेमींना निरोप देण्यासाठी उस्मानाबाद आगारात छोटेखानी पार पडलेल्या कार्यक्रमात शहर व जिल्ह्यातील विविध राजकीय, सामाजिक पक्ष, संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी साहित्यप्रेमींना गुलाबपुष्प देवून घुमानवारीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर हे होते. यावेळी कॉंगे्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्‍वास शिंदे यांनी घुमानला निघालेल्या साहित्यप्रेमींसाठी हे एकप्रकारचे प्रशिक्षण ठरणार आहे. पुढील वर्षी उस्मानाबादमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होईल, अशी आशा सर्वांना आहे. त्यामुळे तिथे जाणार्‍या सर्वांनी तेथील नियोजन पारखावे, असे मत व्यक्त केले. भाजपाचे ज्येष्ठ ऍड. मिलींद पाटील यांनी, पुढील वर्षीचे मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या टीमने प्रयत्न करणे अपेक्षित आहे. त्यासाठी भाजपाचे काही मंत्री महोदयही घुमानला येवून पुढील वर्षीच्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाविषयी चर्चा करून यंदाच्या साहित्य संमेलनाला शुभेच्छा देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मसापचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी केले. तर आभार रणजित दुरूगकर यांनी मानले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंद गोरे, संचालक ऍड. चित्राव गोरे, माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अग्निवेश शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल पाटोदेकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार, संतोष जाधव, दिलीप पाठक नारीकर, नितीन बागल, विशाल शिंगाडे, राजसिंहा राजेनिंबाळकर, अक्षय ढोबळे, विजय पवार, उमेश राजेनिंबाळकर, मयूर काकडे आदी उपस्थित होते. 
दिंडीत दिसणार गुरु-शिष्य भेट घुमानमध्ये होणार्‍या ८८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी उस्मानाबादहून गेलेल्या दोनशे साहित्यप्रेमींनी दिंडी काढण्याचे नियोजन केले आहे. या दिंडीतून संत गोरोबा काका व संत नामदेव या गुरु-शिष्य भेटीचे सादरीकरण दिसून येणार आहे. त्यासाठी प्रत्येकजण वारकरी सांप्रदायाचा पोशाख, भगवी पताका, वीणा, टाळ-मृदंग आदी साहित्य घेऊन या दिंडीत सहभागी होणार आहे.       
 
Top