उस्मानाबाद - हरित सेनेच्या माध्यमातून पर्यावरणाशी निगडीत बाबींशी मैत्री करण्याची निकड शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली पाहिजे. तसेच सध्या जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.   या अभियानाचे महत्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केली. याशिवाय, सामाजिक वनीकरणाची मशाल खांदयावर घेवून वृक्षसंवर्धनाच्या कार्यास चालना दयावी. नवीन पिढीचे आयुष्य समृध्दीकडे न्यावे. शेतकऱ्यांचे व समाजाचे हिताचे उपक्रम राबविण्याच्या
कार्यात योगदान दयावे, असे आवाहनही त्यांनी केले.
  येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सामाजिक वनीकरण विभागाच्या हरीत महाराष्ट्र अभियानांतर्गत राष्ट्रीय हरीतसेना शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीरात डॉ. नारनवरे बोलत होते. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक म्याकलवार, लागवड अधिकारी श्री. बारस्कर, सदानंद डोंगरे, श्री. चोंबे, श्री. खोंदे आदी वन विभागाचे अधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. नारनवरे म्हणाले की, शिक्षकांनी विदयार्थ्यांना विदयादान करताना  त्या परीसराची महिती द्यावी. पर्यावरण अभ्यास हा खूप महत्वाचा विषय आहे. त्या अनुषंगाने शिक्षकांनीही भावी नागरिक हे पर्यावरणप्रेमी राहतील, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जलपुनर्भरण, नालाबांधबंदीस्ती, विहीरी, नाल्याचे व बोअरचे पुनर्भरण, नाला खोलीकरणाची  कामे घ्यावीत. समाजाला व विदयार्थ्यांना साक्षरतेबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखणे, वृक्षलागवड  व वृक्षसंवर्धनाचे महत्व पटवून दयावे, असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी यावेळी केले.
डॉ. नारनवरे म्हणाले की, आपल्या संतानी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे.. असा मौलीक संदेश दिला आहे. तेंव्हा शिक्षकांनी समाजाला पर्यावरणाचे व वृक्षसंवर्धनाचे महत्व पटवून देवून आपल्या शेतात जलयुक्त शिवाराअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवण्याबाबत जनजागृती करावी. विदयार्थ्यांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांनी  शेतीच्या कडेला मोठया प्रमाणात बांबू वृक्ष लागवड करावी.                 

 
Top