बार्शी - नगरोत्थान योजनेतून सिमेंटच्या रस्त्याचे अर्धवट काम केले असतांना त्याखालून जाणार्‍या पाण्याच्या पाईपलाईनची वाट लावल्याने नागरिकांना नवनवीन समस्यांचा सामना करावा लागत आहे. शिवाजी नगर परिसरातील जगदाळे मामा हॉस्पिटल समोरील परिसरात पाण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्याने दररोज हजारो लिटर पाणी रस्त्यावरुन वाहतांना दिसत आहे, तर लाखो लिटर पाणी गटारांत सोडल्याचे दिसून येत आहे.
मागील सहा महिन्यांपासून हा अजब प्रकार दिसून येत आहे. दोन-दिवसांत काम करतो आज सुरु झाले आहे अशी माहिती संबंधीतांनी देत कृपया बातम्या प्रसिध्द करु नका अशा विनंत्याही करण्यात आल्या होत्या. संबंधीत ठेकेदाराचे लाड पुरवणार्‍या अधिकारी कर्मचारी व संबंधीतांकडून नागरिकांनी तक्रारीला केराची टोपली दाखविली आहे. दिवसेंदिवस उन्हाळ्याची तीव्रता वाढत जाणार आणि पाण्याची टंचाई दिसून येणार असतांना नगरपरिषदेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांतून तीव्र संतापाची भावना व्यक्त होत असल्याचे दिसत आहेत. बार्शी नगरपरिषदेच्या स्थापनेला दिडशे वर्ष पुर्ण होत असल्याने एकीकडे शतकोत्तर सुवर्णमहोत्वसवाचा डांगोरा पिटत असतांना नागरिकांना एकदिवसाआड पाणी पुरवठा व सर्वात जास्त पाणीपट्टीची आकारणी करण्यात येते. नागरिकांच्या घरपट्टी व पाणीपट्टी देयकांवरील थकबाकीसाठी पठाणी व्याजाची आकारणी करणार्‍या बार्शी नगरपरिषदेचा अजब कारभार पहायला मिळत आहे.
घर तिथे नळ, घर तिथे शौचालाय असा उपक्रम राबवून एकीकडे अनेकांना नवीन नळजोडणीसाठी प्रवृत्त करण्यात येत आहे तर एक दिवसाआड पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणीपुरवठा तर काही जणांना विना पाण्याचीही पाणीपट्टी आकारुन त्यांच्याकडून ती वसूलही करण्यात येते. नवीन नळजोडसाठी येणार्‍या नागरिकांना अनेक कागदपत्रांची मागणी करुन त्यांना जादा खर्चाच्या प्रक्रिया पार पाडाव्या लागतात. नळजोडणीसाठी खांदाव्या लागण्यार्‍या खड्‌ड्यासाठी खाजगी ठेकेदारा मनमानी रक्कम वसूल करतात तर इकडे मोफत नळ कनेक्शन दिले असे सांगण्यात येते.

 
Top