नळदुर्ग - : शहर व परिसरात वादळ वारे झाले. तर हंगरगा नळ (ता. तुळजापूर) परिसरात रविवारी सायंकाळी गारा पडल्या. या गारांमुळे शेतातील रब्‍बी पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय रास करण्यासाठी काढून ठेवलेल्या गहू, ज्‍वारी, हरभरा या पिकांचेही नुकसान झाले. तसेच नळदुर्ग परिसरातील दहिटणा, गुजनूर, शहापूर, लोहगाव आदी भागात पाऊस झाला असून द्राक्षासह इतर फळबागा, पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. बोरगाव, सिंदगाव, माळुंब्रा परिसरातही अर्धा तास पाऊस झाला. 
गेल्‍या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या रब्‍बी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर वेधशाळेने जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट होण्याचा इशारा दिला होता. कृषी विभागानेही याबाबत शेतकर्‍यांना माहिती देवून शेतातील कामे वेळेत करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण झाले होते. तुळजापूर तालुक्‍यातील हंगरगा नळ परिसरात पाच ते सात मिनिटे गारा पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर तामलवाडी परिसरात वादळी वारे सुटले होते. या पावसामुळे शेतात रास करण्यासाठी काढून ठेवलेल्या ज्वारी, गहू यासह रबीच्या अन्य पिकांसोबतच फळबागांचे नुकसान झाल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात आले.

 
Top