सोलापूर :- संत शिरोमणी सावतामाळी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माढा तालुक्यातील अरण या गावाला तीर्थक्षेत्राबाबत ‘अ’ दर्जा मिळवा. हा दर्जा मिळविण्याबाबत  केंद्राकडे प्रस्ताव पाठवून आवश्यक तो पाठपुरावा करु, अशी ग्वाही ग्रामविकास, जलसंधारण, रोहयो, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.  
     अरण येथे सावता परिषदेच्या वतीने माळी समाज ऐक्य मेळावा घेण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आष्टी तालुक्याचे आमदार भिमराव धोंडे होते. 
       ना. मुंडे पुढे म्हणाल्या की, केवळ माळी समाजालाच नव्हे तर राज्यातील वंचित, शोषित जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल. तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी तसेच महिलांना सुरक्षा देण्यासाठी त्याचबरोबर राज्यातील जनतेच्या स्वप्नांची पुर्तता करण्यासाठी शासन कटीबध्द आहे. सर्वांना अभिमान वाटेल अशा पध्दतीने राज्य सरकार कार्य करेल. जलयुक्त शिवार अभियानात अरणचा समावेश व्हावा यासाठी आपण आवश्यक ती कार्यवाही करु. असे सांगून पुढे त्या म्हणाल्या की, ब दर्जाच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी शासनाच्या वतीने 35 लाख रुपयांचा निधी दिला जातो. यात वाढ करुन  अरणच्या विकासासाठी 50 लाख रुपयांचा निधी दिला जाईल असे सांगितले.  
 
    तत्पुर्वी या ऐक्य मेळाव्याचे आयोजक कल्याण आखाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी आ. धोंडे तसेच आमदार योगेश टिळेकर तसेच स्वागताध्यक्ष बाळासाहेब माळी यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले. यावेळी माळीनगर शुगर फॅक्टरीचे व्यवस्थापकीय संचालक रंजन गिरमे यांना ना. पंकजा मुंढे यांच्या हस्ते संत सावता माळी समाजभुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 
      या कार्यक्रमासाठी जि.प. माजी अध्यक्षा डॉ. निशिगंधा कोल्हे, माजी जि.प. समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, भारत शिंदे, शंकर वाघमारे, अरणच्या सरपंच रुपाली वसेकर, अजिनाथ हजारे, ह.भ.प रमेश महाराज वसेकर यांच्यासह या ऐक्य मेळाव्यासाठी हजारो नागरिक उपस्थित होते.  
 
Top