बार्शी  (मल्लिकार्जुन धारूरकर) तालुक्यातील बृहत, मध्यम व लघु प्रकल्पातील उपलब्ध पाणी साठा पिण्याच्या पाण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार राखून ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री म
स्के यांनी दिली.
सद्यस्थितीत बार्शी तालुक्यातील पाणीसाठ्याची परिस्थिती गंभीर असल्याचे चित्र दिसून येत आहे. पाणी साठ्याचे तालुक्यात हिंगणी, जवळगाव आणि पिंपळगा असे तीन मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी हिंगणी प्रकल्प वगळता उर्वरित दोन्ही प्रकल्पांत पाण्याची पातळी खालावलेली आहे. अठरा लघु प्रकल्पांपैकी सहा प्रकल्पांत थोडासा पाणीसाठा उपलब्ध आहे तर उर्वरित १२ लघु प्रकल्प कोरडे झाले आहेत.हिंगणी पा. मध्यम प्रकल्पात एकूण ९४०.२० द.ल.घ.मी. पैकी उपयुक्त ४६२.२० द.ल.घ.मी. (उपलब्धतेच्या ४०.९४%) पाणी साठा, जवळगाव मध्यम प्रकल्पात एकूण २३१.३६ द.ल.घ.मी. पैकी उपयुक्त २९.०६ द.ल.घ.मी. (उपलब्धतेच्या २.८२%) पाणी साठा, पिंपळगाव मध्यम प्रकल्पात एकूण ८७.१४ द.ल.घ.मी. पैकी उपयुक्त ६३.९६ द.ल.घ.मी. (उपलब्धतेच्या १५.०८ %) पाणी साठा उपलब्ध आहे.अठरा लघु प्रकल्पांपैकी सहा प्रकल्पांत पाणी साठा उपलब्ध आहे त्यापैकी पाथरी एकूण २३.२२ द.ल.घ.मी. पैकी उपयुक्त १४.०६ द.ल.घ.मी. (उपलब्धतेच्या ३.६३%), कोरेगाव एकूण ७.१० द.ल.घ.मी. पैकी उपयुक्त ५.०६ द.ल.घ.मी. (उपलब्धतेच्या ६.१०%), चारे एकूण १४.८१ द.ल.घ.मी. पैकी उपयुक्त ९.०२ द.ल.घ.मी. (उपलब्धतेच्या १९.०९%), कारी एकूण १७.३६ द.ल.घ.मी. पैकी उपयुक्त ९.४८ द.ल.घ.मी. (उपलब्धतेच्या १८.१५%), तावडी एकूण ७.१८ द.ल.घ.मी. पैकी उपयुक्त १.४९ द.ल.घ.मी. (उपलब्धतेच्या ३.८८%), वैराग एकूण ७.३४ द.ल.घ.मी. पैकी उपयुक्त ६.६३ द.ल.घ.मी. (उपलब्धतेच्या १३.०८%), तर उर्वरित कोरडे पडलेल्या लघु प्रकल्पांत वालवड, काटेगाव, कळंबवाडी, ममदापूर, गोरमाळे, शेळगाव (आर), घाणेगाव, इर्ले, तडवळे, देवगाव, डिसकळ, भोयरे या बारा लघु प्रकल्पाने तळ गाठला आहे. उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाटबंधारे विभागाकडून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाणीसाठा राखून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.बार्शी शहरात असलेल्या गणेश तलावातील पाण्याची पातळीही खालावलेली असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील पाणीसाठ्याच्या खालावलेल्या परिस्थितीवरुन उन्हाळ्यात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहराला उजनी पाणीपुरवठा योजनेद्वारे एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने बार्शी शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवणार नाही. परंतु पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक असलेल्या विद्युत पुरवठ्यामध्ये गडबडी निर्माण झाल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या, उजनी जलाशयावर अवलंबून असलेल्या शहरातील दिड ते दोन लाख नागरिकांच्या प्रश्‍नाचा विचार करता ऊसाची शेती करणार्‍या आणि पिण्याची पाईपलाईन फोडून पाण्याचा सर्रास वापर करणार्‍या शेतकर्‍यांवर प्रसंगी गंभीर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 
Top