उस्‍मानाबाद - भगवान वर्धमान महावीरांच्‍या जयंतीनिमित्‍त सकल जैन समाजाच्‍यावतीने गुरूवार दि. 2 एप्रिल रोजी भव्‍य शोभा यात्रा काढण्‍यात आली. जयंतिनिमित्‍त येथील माऊली चौकातील शैतवाळ दिगंबर जैन मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले होते. 
         मंदिरात पहाटेपासूनच अभिषेक व दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. जयंती महोत्‍सवातील मुख्‍य कार्यक्रम असलेली शोभायात्रा मंदिरापासून काढण्‍यात आली. शोभायात्रेचा शुभारंभ आमदार राणाजगजितसिंह पाटील ,नगरपालिकेचे मुख्‍याधिकारी शशीमोहन नंदा यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. यावेळी भारतीय जैन संघटनेचे जिल्‍हाध्‍यक्ष दिपक अजमेरा, सकल जैन समाजाचे अध्‍यक्ष शितल मेहता, मंदिर समितीचे अध्‍यक्ष महावीर दुरूगकर, स्‍थानकवाशी जैन समाजाचे अध्‍यक्ष अॅड. शांतीलाल कोचेटा, कासार जैन संघटनेचे जिल्‍हाध्‍यक्ष राजाभाऊ जगधने, सतिशभाई गांधी आदी उपस्थित होते. पर्युषण पर्वामध्‍ये सलग पाच ते दहा उपवास करणा-या प्रतिभा आजमेरा, राजकुमार आजमेरा, अतुल आजमेरा, जयश्री दुरूगकर, रेखा फडकुले, योगिता धारूरकर, रेखा पलसे, दिपा झांबरे यांचा आमदार पाटील यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी आमदार पाटील, मुख्‍याधिकारी नंदा मेहता यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक उल्‍हास चाकवते यांनी केले तर सुत्रसंचलन उपेंद्र कटके यांनी केले. कार्यक्रमानंतर शोभायात्रेला सुरूवात करण्‍यात आली. भगवान महावीरांचा जयघोष करत हजारो श्रावक - श्राविका सहभागी झाले होते. येथील मारवाडी गल्‍ली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, निंबाळकर गल्‍ली, काळा मारूती परिसर आदी ठिकाणी मिरवणुकीचे जोरदार स्‍वागत करण्‍यात आले. आश्‍वारूढ बाल श्रावक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रेचा समारोप जैन मंदिराजवळ करण्‍यात आला. (छाया - इस्‍माईल शेख)

 
Top