बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) - महात्मा फुले भाजी मंडईतील स्वच्छतागृहाच्या आडोशाची भिंत कोसळल्याने शेतीमाल विक्रेत्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. नगरपरिषदेच्या स्थापत्य व आरोग्य विभागाचा गलथन कारभार तसेच निकृष्ट दर्जाचे काम यामुळे सदरची दुर्घटना घडली आहे.
मंगल भानुदास कांबळे (वय ४५, रा.सोलापूर रोड, दगडी नाका, बार्शी) असे दुर्घटनेतील मयत महिलेचे नाव आहे. मंडईमध्ये मक्याचे कणीस भाजून विक्री करण्याचा या महिलेचा व्यवसाय असून भिंत आडोशाची भिंत कोसळून महिलेच्या डोक्यास, छातीस जबर मार लागला होता.
सदरच्या दुर्घटनेमुळे भाजी मंडईतील दुरावस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. स्वच्छतागृह (मुतारी) च्या आडोशासाठी उभारण्यात आलेल्या ९ ईंची ७ फुट उंचीची भिंत बांधतांना माती व मुरुमावरील फरशीवरच बांधकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी सतत पाणी मुरण्यामुळे जमीन खचून दुर्घटना घडली आहे. मंडईमध्ये भाजी विक्रेत्या महिलांना बसण्यासाठी पुरेशी सुविधा नसल्याने अनेक महिला व विक्रेते मिळेल त्या ठिकाणी आपली दुकाने थाटून व्यवसाय करीत आहेत. शनिवारचा दिवस हा बार्शीतील बाजारचा दिवस असल्याने ग्रामीण भागातील अनेक शेतकरी शेतीमालाची विक्री करण्यासाठी बार्शीतील मंडईत येऊन व्यवसाय करतात. त्यांना किमान सुविधा पुरविणे ही नगरपरिषदेची जबाबदारी असतांनाही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सद्यस्थितीत असलेल्या जागेपेक्षा जास्त जागेची आवश्यकता तसेच व्यवसाय करण्यासाठी कठडे, निवारा शेड बांधणे, गरजेचे आहे.
मयत मंगलची बहिण बायडाबाई करपे हिने जेवणाचा डबा घेऊन आली, मंगलचे जेवण झाल्यानंतर तिची बहिणी घराकडे जेवणासाठी गेल्यानंतर काळी वेळात सदरची दुर्घटना घडली, दुर्घटनेनंतर जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल केल्यानंतर वैद्यंकिय अधिकारी यांनी मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. छाती व डोक्यास मार लागल्याने मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ.रविंद्र माळी यांनी सांगीतले.

 
Top