*जिद्दीचे दुसरे नाव 'जिप्सी'*
___________________________
- वीरा राठोड, औरंगाबाद
 ---------

जगात अनेक मानवी समूह आहेत जे जात, धर्म, पंथ, प्रदेश या सर्व मर्यादांच्या पलीकडे आणि माणूस म्हणून मानवी जगण्याच्या अधिक जवळ जाण्याचा सातत्याने कसोशीचे प्रयत्न करीत राहिले आहेत. परंतु वंशवर्चस्वाच्या नि जात, धर्म श्रेष्ठत्वाच्या अघोरी महत्त्वाकांक्षांनी भेदाभेदाची अन्यायात्मक तीक्ष्ण टोकं पुन:पुन्हा तीव्र होत राहिल्याने जगभरातील मानवहिताचे गाणेच बेसूर करून टाकले आहे. या साऱ्यांचा पहिले बळी ठरलेत, जगभरातील भटके, जिप्सी आणि बंजारे. हे मुशाफिरी करणारे समूह. खरं तर 'हे विश्वची माझे घर' या उक्तीप्रमाणे धरतीला माता आणि आकाशाला पिता मानून अवघ्या जगात विश्वबंधुत्वाचे नाते जोपासू पाहणाऱ्या या मुसाफिरांनी ज्या देशात, ज्या पर्यावरणात प्रवेश केला, तिथला परिवेष नि:संकोचपणे धारण करून जगण्याला हसतमुखाने सामोरे गेले. त्यांनी कुठलाच धर्म, पंथ, देश, प्रदेश, पेशा नि भाषा वर्ज्य मानली नाही. कारण मुळातच ते धर्मविरहित निधर्मी, वर्णबाह्य अवर्ण होते. तरीही भारतात हिंदू आदिवासी, भटके बंजारे, अरब-मुस्लिम देशात मुस्लिम बंजारे आणि पश्चिमी देशात ख्रिश्चन जिप्सी आदी धार्मिक आस्थांमध्ये रममाण झाले. पण त्यांचा धर्मप्रवाहांनी इतिहासापासून आजतागायत पूर्णत्वाने स्वीकार केल्यामुळे सततच्या भटकंतीतून मिश्रभाषी, संमिश्र पद्धतीची संस्कृती जगभरात जन्माला आली. जी भारत आणि आशियात बंजारे भटके म्हणून, तर जगात जिप्सी म्हणून नावारूपास आलेली आहे.
जिप्सी, बंजारा, भटके, नोमॅडस् या तशा प्रवृत्तीवाचक संकल्पना, पण त्यांचे परावर्तन आपण जाती आणि जमातीत करून टाकले आहे. हेच समूह भारतातून राजस्थान, सिंध, पंजाब आदी भूभागातून हिंदूकुश पर्वतामार्गे, कॅप्सिअन समुद्रामार्गे इराण, तुर्की, मगदुनिया, ग्रीस, रोमानियापासून स्पेन, अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचले, जे भारतीय बंजारे, डोम, डोंबारी, सिकलगार, लोहार, गुर्जर, सांसी आदी जमातींचे लोक होत. बंजारांसारखे प्राचीन व्यापारी, कलेवर उपजीविका असणाऱ्या कलावंत जमाती, कारागीर, हस्तशिल्पी, लढाऊ जमाती या इसपूर्वीपासून १४व्या शतकापर्यंत भारतातून वेगवेगळ्या कालखंडात, अनेकविध कारणांनी बाहेर जात राहिल्या. बुद्धपूर्व काळापासून व्यापारानिमित्त गेलेले बंजारे लोक, इसपूर्व ३२३मध्ये अलेक्झांडरने अनेकांना आपल्यासोबत नेले. महंमद गझनीने अनेकांना गुलाम बनवून नेले. अरब, तुर्क, मंगोल आदींच्या वाढत्या आक्रमणामुळे नि सम्राट अकबराच्या सैन्याने ३० हजार बंजारांना ठार मारल्यामुळेही, हे सर्व लोक पुन्हा मायदेशी परतले नाहीत. पुढे ते जगभर पसरत गेले. हजारो वर्षांपासून हे लोक गुलाम, मजूर म्हणूनच जीवन कंठत आले आहेत.
या घटकेला मध्यपूर्व आशियापासून युरोप, रशिया, स्वीडन, स्पेन, ब्रिटन, इटली, तुर्की, फ्रान्स, ग्रीस, रोमानिया, हंगेरी आदी ५०-५५ देशांत त्यांचे वास्तव्य अाढळते. यात एकूण १३ प्रकारचे जिप्सींचे भिन्न भिन्न गट आहेत. जिगेनर, साईगेस, मानुस, तातार, गिटानी, यासीमागाल, शिंगन, रोमा, रोमानी, लोमानी, डोमारीन, लोमवरेन आदी नावांनी त्यांना ओळखले जाते. परंतु भारतीय बंजारांप्रमाणे ते आपली ओळख रोमा वा जिप्सी अशीच करून देतात. आरंभी कलावंत, कलोपासक, नृत्य, गीत-संगीतात रमणारे, शिल्पकार, शस्त्र बनवणारे, आज्ञाधारक सैनिक म्हणून त्यांना सन्मानजनक वागणूक मिळत गेली, परंतु काही शतकांपासून जगात सुरू झालेल्या वर्चस्वाच्या लढाईमुळे त्यांना प्रचंड जीवघेण्या संघर्षातून वाटचाल करावी लागत आहे. त्यांना तिसऱ्या दर्जाचा माणूस म्हणून, चोरटे, अस्पृश्य म्हणून अपमानजनक वागणूक दिली जात आहे. वंशभेदाच्या रोषाचे ते बळी ठरत आहेत. अनेक देश त्यांना नागरिक मानायला तयार नाहीत. घर, नोकरी, काम देत नाहीत. अनाथ जगणे त्यांच्या वाट्याला आले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या नाझी फौजेने लाखो जिप्सींना मारले होते. अन्याय, अत्याचार सहन करूनही आपल्या ओळखीसह आपले विलक्षण वेगळेपण अबाधित ठेवण्याच्या त्यांच्या जिद्दीला, संघर्षाला सॅल्यूूटच करणे भाग आहे.
जिप्सी हे भारतातून जगभरात जाऊन पोहोचले, हे भारतीय तसेच रोमानी जिप्सी लेखक, अभ्यासक, संशोधकांनी अनेकवार सिद्ध केले आहे. ज्यामध्ये डॉ. कोस्नोव्हस्की, डॉ. इयान हेनकॉक 'The Gypsies forgottten children of Indian', 'On Romani Origins and Identity.' डॉ. रोनाल्ड ली 'The Grammer of Lamani' शिवाय डॉ. एस. एस. शशी, डॉ. राजेंद्र ऋषी, केतकर, डॉ. गणेश देवी आदींची याबाबतची निरीक्षणे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. अभ्यासकांच्या मते, अधिकांश जिप्सींचे आचरण, भाषा, लोकसाहित्य, रहनसहन, नृत्य संगीत, पोशाख, दागदागिने, खानपान आदी बाबतीत भारतीय बंजारांशी विलक्षण स्वरूपाचे साम्य आहे.रोमा, रोमानी, लोमानी, लोवारीन या संख्य

साभार - दिव्य मराठी
 
Top