बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) दिल्‍लीतील सामुहिक बलात्‍काराचा निषेध करत सामाजिक अधःपतन होत असल्‍याने नाटय चळवळ देखील नैतिकतेचे धडे देईल, असे मत गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी व्‍यक्‍त केले. बार्शीतील आमदार दिलीप सोपल यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त आयोजित निमंत्रितांच्‍या राज्‍यस्‍तरीय एकांकिका स्‍पर्धेच्‍या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
    यावेळी व्‍यासपीठावर राष्‍ट्रवादीचे जिल्‍हाध्‍यक्ष मनोहरभाऊ डोंगर, आ. दिलीप सोपल, आ. राजन पाटील, नगराध्‍यक्ष कादर तांबोळी, पंढरीनाथ कांबळे, नागेश अक्‍कलकोट आदी उपस्थित होते.
    पुढे बोलताना पाटील म्‍हणाले, समाजातील रूढी परंपरा, वास्‍तव, अंधश्रद्धा यांचे सादरीकरण करत नाट्यचवळवळीद्वारे जनजागृती होत असून नाटक हे शहरी भागात जोमाने होत असून खेड्या पाड्यातील शेवटच्‍या माणसांपर्यंत पोहोचणे आवश्‍यक आहे. मोठ्या सिनेमांना कलाकार देण्‍याचे कामही नाटकामुळे शक्‍य झाले. पूर्वीच्‍या काळात कलांना राजाश्रय मिळत परंतु सध्‍याच्‍या लोकशहीत असे आवश्‍यक असलेले प्राधन्‍य मिळत नसल्‍याची खंत त्‍यांनी व्‍यक्‍त केली. साहित्‍य, कला याविना जीवन हे रूचीहीन वाटते, नाटक हे लोकशिक्षक व समाजशिक्षकाचे कार्य करते. मराठीला समृध्‍दी नाटकामुळेच मिळते. चित्रपटांमुळे प्रेक्षकांनी नाटकाकडे पाठ फिरवली हा विचार करण्‍यापेक्षा आहे हा प्रेक्षक अधिक रसिकतेने या क्षेत्राकडे वळेल हे करणे आवश्‍यक आहे. पारंपारिक महाराष्‍ट्रात भजन किर्तन, संतवाणी, यांमधून समाजाची नैतिक जडणघडण होत असे. परंतु ते आज लयाला जात असून माणूस सैतान होत चालला आहे हे दुदैवी आहे. अशा कार्यक्रमातून दिग्‍गज कसदार कलाकार महाराष्‍ट्राला मिळावेत, जेणेकरुन संस्‍कारक्षम तरुणाई उद्याचा समाज घडवेल. पंढरीनाथ कांबळे यांच्‍या अभिनयाचे कौतुक करत आम्‍ही राजकीय पटलावर कलाकार असून एका दिवसात अनेक प्रकारचे कलाप्रकार सादर करीत असतो, असेही त्‍यांनी यावेळी म्‍हटले.
    आ. सोपल यांना वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा देत सभागृहातील सोपलांचे अस्तित्‍व जनतेसमोर मांडले, आण्‍णा हे विधानभवनातील लॉबीचे अध्‍यक्षपद कायम टिकवून असल्‍याचे सांगत विनोदी, झणझणीत बोल फक्‍त सोपलच बोलू शकतात. जनतेच्‍या भावनांप्रमाणे तीव्र स्‍वरुपात मागण्‍या फक्‍त आण्‍णाच मागतात बार्शीकरांच्‍या भावनांचा आदर करुन आपल्‍या अपेक्षांचं ओझं निश्चितच उतरविणार आपल्‍या अपेक्षा पूर्ण करणार असल्‍याचेही त्‍यांनी यावेळी सांगितले.
    पंढरीनाथ कांबळे यांनी बार्शीसारख्‍या ठिकाणी एकांकिका स्‍पर्धेचे आयोजन केल्‍याबद्दल धन्‍यवाद व्‍यक्‍त केले. काळाच्‍या ओघाने पारितोषिके रक्‍कमा महाकरंडकाचे आकर्षण वाढत आहे. याच कार्यक्रमातून आबांशी चर्चा मनमोकळेपणे करता आली, त्‍याबद्दल त्‍यांनी समाधान व्‍यक्‍त केले.
    आ. सोपल यांनी बोलताना म्‍हणाले, बार्शीकर हे नाट्यप्रेमी असल्‍याने महाराष्‍ट्रातील सर्वात‍मोठी एकांकिका स्‍पर्धेची मेजवानी उपलब्‍ध करुन दिल्‍याचे सांगत आबांनी तालुक्‍यासाठी सातत्‍याने मदत केली आहे. आबा हे महाराष्‍ट्रातील वृध्‍दांचा मानसिक आधार आहेत. पेन्‍शनर्सच्‍या राज्‍यव्‍यापी अधिवेशनाचे उदघाटक आहेत. प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍यात नाटक असते, नाटकांशिवाय मराठी माणूस जगणे शक्‍य नाही, असे म्‍हणत विजेत्‍यांचे अभिनंदन करुन संयोजकांचे कौतुक केले.
    या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक नागेश अक्‍कलकोटे यांनी तर सुत्रसंचालन रामचंद्र इकारे यांनी केले. कार्यक्रम यश‍स्‍वीतेसाठी रणजित गायकवाड, सचिन गावसाने, गणेश अक्‍कलकोटे, संतोष घुमरे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.
बक्षीस वितरण
1) प्रथम क्रमांक - 61 हजार रूपये महाकरंडक ट्राफी, एकूट समूह, रंगसंगती मुंबई, 2) द्वितीय क्रमांक – 41 हजार रूपये, करंडक, सायलेंट स्‍क्रीन, श्री. मुंबई, 3) तृतीय क्रमांक - 21 हजार रूपये करंडक, वास इज वासव, तांडव पुणे 4) चतुर्थ क्रमांक –11 हजार रूपये करंडक आता पास, संक्रमण पुणे.
    स्‍पर्धेत परिक्षक म्‍हणून प्रा. दिलीप गाडे (अभिनेते), किशोर साव (दिग्‍दर्शक), सौ. शोभा बोल्‍ली, ज्ञानेश मुळे (दिग्‍दर्शक क्राईम डायरी) यांनी काम पाहिले.
आगळा वेगळा सत्‍कारआर आर पाटील यांच्‍या हस्‍ते दिलीप सोपल यांचा विशेष सत्‍कार करताना महात्‍मा फुलेंची पगडी, शाहू महाराजांची तलवार अन् भारतरत्‍न डॉ. बाबासाहेबांची राज्‍यघटना (संविधान) देऊन गौरविण्‍यात आले.


 
Top