सिंगापूर -: दिल्लीतील सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या युवतीच्या कुटुंबियांनी म्हटले आहे की, आमची मुलगी गेल्याचे आम्हाला अपार दु:ख आहे. पण तिच्या मृत्यूच्या निमित्ताने देशातील महिला अधिक सुरक्षित झाल्या तर दु:ख थोडे हलके झाल्यासारखे वाटेल. ही माहिती सिंगापूरमधील भारतीय दूतावासातील अधिकारी यांनी दिली आहे.
      पीडित युवतीचा शनिवारी मध्यरात्री सिंगापूरमध्ये माऊंट एलिझाबेझ रुग्णालयात मृत्यू झाला होता. पीडित युवतीचा मृतदेह भारतात आणण्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान सिंगापूरात दाखल झाले आहे. युवतीचा मृतदेह भारतात आणण्यासाठी करावी लागणारी कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. ती प्रक्रियाही पूर्ण झाली असून, हे विशेष विमान सायंकाळपर्यंत नवी दिल्लीत दाखल होईल.
       भारतीय दूतावासातील अधिकारी टी. सी. ए. राघवन यांनी माध्यमांना सांगितले की, पीडित युवतीवर ज्या क्रूरतेने सामूहिक अत्याचार करुन तिला लोखंडी रॉडने मारहाण केली ते पाहता व आता आपली मुलगी या जगात नसल्याचे कळताच पीडितेच्या कुटुंबियांना जबरी धक्का बसला आहे. मात्र, त्यांना जगभरातून सांत्वनाचे संदेश व फोन येत आहेत. तसेच आम्ही तुमच्या दुखात सहभागी झाल्याचे सांगत आहेत. त्यामुळे हे कुटुंब कोसळून गेले असले तरी या कुटुंबाला थोडे सावरावे लागत आहे. तिच्या कुटुंबियांनी म्हटले आहे की, आम्हाला आशा आहे की आमची मुलगी जरी याला बळी पडली असली तरी, या घटनेच्या निमित्ताने दिल्लीतील व भारतातील महिला अधिक सुरक्षित व भीतीमुक्त होतील.
        या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांचे अपरिमित हानी झाली असून, या कुटुंबाला हे जबरी दु:ख सहन करण्याचे साहस व धैर्य मिळो. या घटना खूपच किळसवाणी आहे, असेही राघवन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

* सौजन्‍य दिव्‍यमराठी
 
Top