नवी दिल्ली -: दिल्लीतील सामूहिक बलात्काराला बळी ठरलेल्या पीडित तरुणीच्या पार्थिवावर रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्‍यात आले. यावेळी केंद्रीय राज्य गृहमंत्री उपस्थित होते. सिंगापूर येथून एका विशेष विमानाने रविवारी पहाटे साडेतीन वाजेला पीडित तरुणीचे पार्थिक दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. यावेळी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित होत्या.
         गेल्या 13 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणा-या 23 वर्षीय बलात्कार पीडित तरुणीचा शनिवारी रात्री 2 वाजून 15 मिनिटांनी मृत्यू झाला होता. सिंगापूर येथील माउंट एलिझाबेश रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. पार्थिवासोबत पीडितेचे आई-वडिल, भाऊ व भारतीय दूतावासाचे अधिकारी होते.
       शवविच्छेदन झाल्यानंतर तरुणीचे पार्थिव घेऊन विशेष विमान भारतीय वेळनुसार शनिवारी रात्री साडे दहा वाजता सिंगापूरहून भारताकडे रवाना झाले होते. बलात्कार पीडित तरुणीच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात यावे तसेच 29 डिसेंबर हा दिवस 'महिला अत्याचारविरोधी दिन' म्हणून  घोषित करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती.
         पीडित मुलीची शुक्रवारी प्रकृती खूपच नाजूक बनली होती. तिच्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांनी काम करणे बंद केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे. सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयातील कर्मचा-यांनी पीडित तरुणीच्या इच्छाशक्तीला व धौर्याला सलाम ठोकला. त्या तरुणीने खूपच हिंमत दाखवली, तिला जगायचे होते. भारतातून तिला गंभीर अवस्थेतच आणून येथे भरती केले गेले होते. तिला वाचविण्याचा आम्ही भरपूर प्रय़त्न केला मात्र आम्ही यशस्वी ठरलो नाही, असे रुग्णालयाच्या कर्मचा-यांनी म्हटले आहे.
          दरम्यान, 16 डिसेंबर रोजी चालत्या बसमध्ये सहा नराधमांनी या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता. तसेच तिच्यावर अमानवी अत्याचारही  केला होता. एवढेच नाही तर तिला चालत्या बसमधून फेकून देण्यात आले होते. दिल्लीतील सफरगंज रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल करण्‍यात आले होते. परंतु दिवसेंदिवस तरुणीची प्रकृती खालावत चालली होती. त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला सिगांपूर येथील माउंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तेथेही पीडित मुलीची प्रकृती खूपच नाजूक बनली होती. तिच्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांनी काम करणे बंद केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे.
        पीडितीने आपल्या आईला विचारले होते की, आरोपींना पकडले का?. त्यावर तिच्या आईने तिला हो सांगताच त्यांना फाशीची शिक्षा द्यायला हवी, अशी इच्छा आईकडे व्यक्त केली होती. तसेच तिला जगायचे होते. तिच्यावर इतका भीषण प्रसंग येऊनही तिने धीर सोडला नव्हता. अखेर संसर्ग वाढतच राहिल्याने तिची प्रकृती खालावत गेली होती. अखेर तिचा शनिवारी मृत्यू झाला. तिची जगण्याची दुर्दम इच्छाशक्ती अपूर्णच राहिली असून, तिच्या इच्छेखातर सरकार बलात्कारातील आरोपींना फाशीची शिक्षा तरी देईल का, असा सवाल देश विचारत आहे.
डॉक्टर म्हणतात : दिल्लीतच सर्व अवयव निकामी झाले होते, सिंगापुरात केवळ तपासणी झाली
पीडित तरुणीसोबत सिंगापूरला गेलेले मेदांता हॉस्पिटलचे डॉ. यतीन मेहता यांनी सांगितले, तिच्या रक्तात प्लेटलेट्सची निर्मिती ठप्प झाली होती. फुप्फुसे निकामी झाली होती. फुप्फुसांसह पूर्ण शरीरात इन्फेक्शन पसरले होते. त्यामुळे तिचे अनेक अवयव काम करत नव्हते.
        डॉ. मेहता यांनी सांगितले, सिंगापुरात तिला आणल्यानंतर तिची अवस्था अत्यंत नाजूक होती. त्यामुळे तिच्यावर अधिक उपचार करता आले नाहीत. तेथे पोहोचताच डॉक्टरांनी तिच्या शरीरातील सर्व अवयवांची तसेच रक्ताची चाचणी केली. मात्र, अधिक उपचार करण्याइतका अवधी त्यांना मिळाला नाही. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचे महासंचालक डॉ. जगदीश प्रसाद यांनी तिला उपचारासाठी सिंगापुरात पाठवण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, 25 डिसेंबरच्या रात्री तिला हार्ट अटॅक आल्यानंतर तिची प्रकृती अधिकच नाजूक झाली. आम्ही डॉक्टरांच्या टीमसह इतर डॉक्टरांचाही सल्ला घेतला होता. मात्र, परिस्थिती गंभीर होती. क्षण न् क्षण किमती होता. त्यामुळे त्याच दिवशी दुपारी तीननंतर तिला अमेरिका किंवा लंडनला हलवण्याचा निर्णय झाला होता. स्थिती आणखी बिघडण्यापूर्वी वेळ न दवडता आम्ही तिला सिंगापूरला पाठवण्याचा निर्णय घेतला. तेथे तिच्यावर सर्वतोपरी उपचार करता येतील, ही त्यामागची धारणा होती.
पाच जणांना फाशीच होईल, सहावा मात्र सुटू शकतो
बलात्काराच्या आरोपींपैकी किमान 5 नराधमांना तरी मृत्युदंड होऊ शकतो. अल्पवयीन असल्याने सहावा आरोपी मात्र सुटू शकतो. हे मत आहे कायदेतज्ज्ञांचे. सिंगापुरात मुलीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सर्व आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे. केवळ सरकारपक्षाला ते सिद्ध करावे लागेल. अर्थात हे कठीण काम नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खटल्याची सुनावणी 4 जानेवारीपासून फास्ट ट्रॅक कोर्टात रोज होणार आहे. आरोपींना फाशी देण्यासाठी कोलकात्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व निर्घृण खून करणार्‍या धनंजयच्या प्रकरणाचा संदर्भ घेतला जाऊ शकतो. धनंजयला या प्रकरणात फाशीची शिक्षा झाली होती.
* सौजन्‍य दिव्‍यमराठी

 
Top