उस्‍मानाबाद -: कंटेनर व पिकअप यांच्या भिषण अपघातात १४ ठार तर १५ जण जखमी झाल्याची घटना सोलापूर-धुळे महामार्गावरील चोराखळी पाटीजवळ मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली. मृताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तिवली जात आहे. अपघातातील मृत व जखमी श्री क्षेत्र तुळजापूरहून श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवून उपळाई (ता. कळंब) या आपल्या गावाकडे परतत असताना काळाचा घाला या भाविकांना बसला.
               बाबासाहेब रामप्रभू मुंडे (२३), कविता बाळासाहेब मुंडे (४०), भास्कर मुंडे (७०), तारामती गोपाळ मुंडे (५५), सचिन माणिक हरभरे (२१), अमोल बजरंग मुंडे (१७), सुमन महादेव मुंडे (३०), महादेव रावण मुंडे, विलास साहेबराव वनवे (२५), अण्णा लक्ष्मण दराडे (२७), कौशल्या जालिंदर दराडे, विनोद दत्तात्रेय नागरगोजे, पोपट फुलचंद बांगर, चालक हनुमंत शिवाजी जाधवर (रा. चुंभ, ता. बार्शी) असे अपघातात मरण पावलेल्‍यांचे नावे आहेत.
        तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवून धार्मिक विधी उरकून मंगळवारी सायंकाळी उशिरा कळंब तालुक्यातील उपळाई गावाकडे परतणार्‍या भाविकाच्या पिकअप (एमएच 09 डीसी 945) व्हॅनास कंटेनर (एमएच 20 ए 9910) ने जोरदार धडक देवून झालेल्या भीषण अपघातात चौदाजण ठार झाल्याची व पंधरा जण गंभीर जखमी झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. हा अपघात उस्मानाबादपासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या चोराखळी पाटीजवळ सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातातील जखमींना उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. 
             ही घटना समजताच माजी मंत्री तथा उस्‍मानाबाद जिल्‍ह्याचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, शिवसेनेचे आमदार ओमराजे निंबाळकर यांच्‍यासह अनेकांनी शासकीय रूग्‍णालयात जाऊन अपघातातील जखमींची विचारपूस केली. या दुर्दैवी घटनेमुळे उस्‍मानाबाद जिल्‍ह्यावर शोककळा पसरली असून उशिरापर्यंत पोलिसात या घटनेची नोंद झाली नाही.
 
Top