बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) :  दवाखान्याच्या कामानिमित्‍त बार्शीत आलेल्या महिलेचे दागीने बुधवारी दुपारी दिडच्या सुमारास चोरुन पळ काढणार्‍या तीन महिलांना नागरिकांनी पाठलाग करुन पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.
     सोन्याचे दागीने चोरुन पळ काढणार्‍या शकिला अनिल भोसले (वय 30 रा. अहमदनगर एम.आय.डी.सी.), चंदाबाई कान्या पवार (वय 35 रा. निजामजवळा), अक्षदा दिलीप काळे (वय 20 रा. निजामजवळा) व त्यांच्या जवळील 6 महिन्याचा लहान मुलगा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
     याबाबत अधिक माहिती अशी की, सुनंदा रामदास वायकर (वय 45 रा. पिंपरी साकत ता. बार्शी) ही महिला दवाखान्यासाठी आपल्या नातेवाईकासोबत बार्शीत आली होती.  घरी जातांना त्यांनी येथील सराफ बाजारातून काही सोने खरेदी केले. यावेळी पासून काही महिलांनी त्या महिलेवर पाळत ठेऊन पाठलाग केला. सुनंदा व त्यांची नातेवाईक या ऐनापूर मारुती रोडवरुन बस स्थानकाकडे निघाल्या असता पाळत ठेवणार्‍या महिलेने सोन्याचे दागीने घेऊन पळ काढण्यास सुरुवात केली व तातडीने एका रिक्षात बसून वेगाने निघून गेले. सदरचा प्रकार लक्षात आल्याने सुनंदा वायकर यांनी आरडाओरड तसेच मोठ्याने रडण्यास सुरुवात केली. सदरच्या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून ऐनापूर रोडवर असलेले हनुमान गणेश मंडळाचे कार्यकर्ते दादा तोडकरी, शिवसेनेचे पदाधिकारी विराज विभूते या रस्त्यावरुन जात असलेले पारेकर व नागरिकांनी त्या रिक्षाचा पाठलाग केला. सदरची रिक्षा अडवून त्या तीन महिलांना खाली उतरवले. गर्दीचा व गोंधळाचा ङ्खायदा घेत सदरचा रिक्षावाला पळून गेला परंतु सदरच्या तीन आरोपींना पकडण्यात नागरिकांना यश मिळाले. सदरच्या घटनेनंतर पोलिसांना कळवून त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
     आजपर्यंत अनेक वेळा स्त्रियांच्या दागीने, मंगळसूत्र चोर्‍या झाल्याने बार्शी शहरात खळबळ उडाली आहे. कधी दुचाकीवरुन येणार्‍या चोरट्याने, कधी बोगस सी.आय.डी., कधी पोलिस असल्याचे सांगून, कधी दागीन्यांना पॉलीश करतो म्हणून, कधी दरोडा पडल्याचे सांगून, कधी दंगल झाल्याचे सांगून, कधी डोळ्यात चटणी टाकून इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करुन अनेक चोरट्यांनी आपले हात साफ केले. कित्येकांनी तर इज्जतीला घाबरुन तक्रारीच दिल्या नाहीत तर कित्येकांच्या तक्रारीच दाखल झाल्या नाहीत. कित्येकांच्याकडे खरेदीच्या पावत्या मिळाल्या नाही, कित्येकांनी घरच्यांना समजल्यास घरुन मोठा अपमान होईल या भितीने तक्रार दिली नाही. लहान मोठ्या चोर्‍या अनेक वेळा झाल्या परंतु अनेकांच्या रितसर तक्रारी दाखल न झाल्याने सदरच्या चोर्‍या करणार्‍यांचे मनोधैर्य वाढले. बार्शीत आले की आपल्याला नक्कीच शिकार मिळते असा आत्‍मविश्वास चोरट्यांना वाटत असल्याने सदरच्या प्रकार करणार्‍या चोरट्यांचा सुळसुळाट बार्शी शहरात झाला आहे. अशा प्रकारची घटना घडल्यास नागरिक देखिल त्या वेळेला लक्ष देऊन करावयाची मदत करत नसल्याने व नसती झंझट नको या मानिसकतेतील लोकांमुळे चोरट्यांचे फावते आहे. ऐनापूर मारुती रोडवरील युवकांनी त्वरीत पावले उचलून गरजू महिलेस मदत करत चोरट्या महिलांचा पाठलाग केल्यानेच आज या तीन चोरट्या महिलांना अटक करण्यात आली आहे. सदरच्या घटनेचा आदर्श घेऊन नागरिकांनी वेळोवेळी गुन्हेगारांना अद्दल घडविल्यास पोलिसांचेही काम कमी होईल. त्याचप्रमाणे नागरिकांनाही विनासंकोच बाजारात फिरणे सोईचे होईल.
 
Top