नळदुर्ग -: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका संघटित व्हा, संघर्ष करा’ असा महामंत्र दिला असून त्यांच्या स्वप्नातला अपेक्षित समताधिष्ट समाज निर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घ्या
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नळदुर्ग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ व बी.आर. ग्रुप, इंदिरानगर च्यावतीने शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून बोलताना आलुरे गुरूजी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून एक व्यक्ती एक मत देऊन राजकीय व सामाजिक समता निर्माण केली. हे जरी खरे असले तरी अजूनही या देशात आर्थिक विषमतेची दरी मोठ्याप्रमाणावर रूंदावत असल्याचे दिसत आहे. गरीब हा गरीबच राहत असून श्रीमंत हा श्रीमंतच होत चालला आहे. ही एक चिंतेची बाब असून आजच्या युवकांनी थोर महापुरुषाचे विचार आत्मसात करुन त्यांचे कार्य व प्रेरणा समाज प्रबोधनासाठी विचारात आणावे, असेही शेवटी त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आज महिलांना व बहुजनांना आरक्षणाच्या माध्यमातून राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात येण्याची संधी मिळाली असून त्यांच्यामुळेच मला जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद मिळाले. दि. 14 एप्रिल ते 30 एप्रिल या पंधरवाड्याच्या दरम्यानच सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या विचाराचे स्मरण न करता त्यांच्या विचारांचा आदर्श येणा-या पिढीसमोर ठेवण्यासाठी सतत कार्य करण्याची गरज आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मराठा सेवा संघाच्या महिला कार्यकर्त्या अँड. वैशाली डोळस (औरंगाबाद), जि.प. सदस्य दिलीप भालेराव, युवक कॉंग्रेस जिल्हा सचिव भालचंद्र लोखंडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत महात्मा गौतम बुध्द व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने मंडळाचे संस्थापक मारुती खारवे, सचिन निकंबे, रुपेश माने, अमित गायकवाड, प्रितम बनसोडे, आतितोष खुने, सचिन गायकवाड आदींसह कार्यकर्त्यांच्यावतीने हार, तुरे, फेटा याला फाटा देऊन साधेपणाने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सुरुवातीस श्रीराम पोतदार, खंडू दादा यांचे भीमगीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्याबद्दल पत्रकार एस.के.गायकवाड, विलास येडगे, शिवाजी नाईक, सुहास येडगे, पोलीस उपनिरीक्षक बंटी माळाळे, जयकुमार गायकवाड, शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष बसवराज धरणे, श्रीराम पोतदार, तौफीक कुरेशी आदींचे बुके देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात जयंतीनिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास नगरसेविका लक्ष्मी खारवे, तुळजापूर तालुका दक्षता समितीच्या सदस्या शाहेदाबी सय्यद, कल्पना गायकवाड, संगीता गायकवाड, कॉंग्रेस सेवा दलाचे शहराध्यक्ष विनायक अहंकारी, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर, शहरप्रमुख संतोष पुदाले, रिपाइंचे अरुण लोखंडे, गोविंद जाधव, भारतीय बौध्द महासभेचे शाम नागिले, बाळू बागडे, बसवंत बागडे, प्रा. पी.एस. गायकवाड आदीजण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारुती खारवे यांनी तर सुत्रसंचालन व आभार मुकेश सोनवणे यांनी मानले.