सांगोला :- दुधेभावी मधून कवठेमहांकाळ तालुक्यातील दहा गावांना तसेच सांगोला तालुक्यातील 17 गावांना पाणी मिळवून देण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावू व पाणी मिळवून देऊ असे आश्वासन राज्याचे गृहमंत्री नाम. आर.आर.पाटील यांनी दिले.   
     सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सांगोला तालुक्यासाठी दिलेल्या 100 ट्रक चार्‍याचे वाटप गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, माजी आमदार डॉ. राम साळे, राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे, बाबूराव गायकवाड, जि. प. सभापती जयमालाताई गायकवाड, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, शिवानंद पाटील, चंद्रकांत हाके, विद्याताई शिंदे, राणी दिघे आदींसह जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम, जिल्हा पोलीस प्रमुख राजेश प्रधान व इतर मान्यवर उपस्थित होते. 
      गृहमंत्री पाटील पुढे बोलताना म्हणाले की, दुष्काळात वाढदिवस साजरे करणे हे टीकेचे लक्ष ठरत आहे. परंतु कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी 100 ट्रक चारा पाठवून एक आदर्श घेण्यासारखा उपक्रम राबविला आहे. सध्या महाराष्ट्रात 7 लाख जनावरे छावणीत असून त्यांच्या चार्‍यासाठी 850 कोटी रुपये खर्च झाला आहे. येत्या 1 तारखेपासून छावण्यातील जनावरांच्या अनुदानात वाढ करण्यात येणार असून ती मोठ्या जनावरांना 75 रुपये तर लहानांना 35 रुपये अशी करण्यात येणार आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील 10 व सांगोला तालुक्यातील 17 गावांना म्हैसाळचे पाणी मिळण्यासाठी सध्या सर्वे चालू असून कॅनॉलमार्फत हे पाणी मिळविण्यासाठी आपण आग्रही भूमिका घेणार असून आपल संपूर्ण ताकद पणाला लावून हे पाणी मिळवून देऊ व हा दुष्काळ शेवटचा दुष्काळ ठरावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. टेंभू योजनेसाठी 150 कोटी व म्हैसाळ योजनेसाठी 150 कोटी असे एकूण 300 कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असून ही कामे वर्षभरात पूर्ण केली जाणार असल्याचे सांगून सध्या राष्ट्रवादीसाठी वृत्तपत्र व मिडीयाची वेगळी फुटपट्‌टी असल्याचे सांगून दुष्काळाचा फायदा इतर राजकीय पक्ष घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
Top