नळदुर्ग -: बुध्दगया महाबोधी विहार परिसरातील बॉम्ब स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून करुन आरोपीना फाशीची शिक्षा दयावी, तसेच जळकोट (ता. तुळजापूर) येथील गावात जमावाने सोलापूर येथील रहिवाशी असलेल्या मागासवर्गीय आनंद चंद्रकांत गायकवाड यास मारहाण करुन मृत्यूस भाग पाडल्याच्या घटनेचा निषेध करुन त्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करुन कडक कारवाई करण्याची मागणी रिपाइंचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यानी नळदुर्ग येथे आयोजित निषेध मोर्चाप्रसंगी केली.
     नळदुर्ग येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुळजापूर व नळदुर्ग शहर शाखेच्यावतीने बुध्दगया महाबोधी विहार परिसरात झालेला बॉम्ब स्फोट व तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे मागासवर्गीय समाजातील आनंद गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नळदुर्ग येथे निषेध मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करुन जाहीर निषेध सभा घेण्यात आली. यावेळी ओव्हाळ हे बोलत होते.
       सुरुवातीस भिमनगर येथील बौध्द विहारात तथागत महात्मा गौतम बौध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मोर्चा काढून कुरेशी गल्ली, किल्लागेट, चावडी चौक मार्गे बसस्थानकासमोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले. त्यानंतर जाहीर निषेध सभा घेण्यात आली. याप्रसंगी जि.प. सदस्य हरिष डावरे, आनंद पांडागळे, एस.के. चेले, तानाजी कदम, गजानन सोनवणे, रणजित मस्के, किर्तीपाल गायकवाड आदींनी आपले विचार व्यक्त केले. या मोर्चाचे नेतृत्व रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, तुळजापूर तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, नळदुर्ग शहराध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, शहर सरचिटणीस उत्तम डावरे, शहर उपाध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, अरुण कदम, अरुण लोखंडे आदींनी केले. शेवटी दिवंगत आनंद गायकवाड याना श्रध्दांजली वाहून विविध मागण्याचे निवेदन नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शेटकर व तलाठी काळे याना देण्यात आले.
 
Top