अणदूर : ग्रामीण भागात रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने या रस्त्यांवरून धावणार्‍या नादुरुस्त बसगाड्यांमुळे अनेक वेळा प्रवाशांची हेळसांड झाल्याचे चित्र पहावयास मिळते. परंतु, खास प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेली ‘यात्रा स्पेशल’ बसगाडीही सातत्याने पंर होऊन प्रवाशांची गैरसोय झाल्याने उमरगा आगाराच्या काराभाराविरोधात यात्रेकरू प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.
     आषाढी वारीनिमित्ताने पंढरपूरसाठी खास उमरगा-पंढरपूर ही ‘यात्रा स्पेशल’ बस (क्र. एमएच.२0 बीएल १९७१) सुरू करण्यात आली. मात्र, ही बस खराब टायर-ट्युबमुळे तीन दिवसात तब्बल अकरा वेळा पंर झाल्याने प्रवाशांसोबतच चालकांचेही हाल झाले. शिवाय बस पंक्चर काढण्यासाठी आगाराचा मेकॅनिक उपलब्ध नसल्याने चालकालाच टायरची खोल-फिटिंग करावी लागली. ग्रामीण भागात नादुरुस्त बसगाड्यांमुळे प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे प्रवास सुखाचा होण्याऐवजी त्रासाचा झाल्याच्या कडवट प्रतिक्रिया प्रवाशांतून ऐकावयास मिळाल्या.

ही टेक्निकल बाब..
आषाढी वारीसाठी खास यात्रेकरूंसाठी सुरू करण्यात आलेल्या यात्रा स्पेशल बसगाडीच्या अवस्थेबाबत आगारप्रमुखांशी संपर्क साधला असता, त्यांनी रा. प. महामंडळाच्या कारभारावर पांघरूण घालत, चक्क ही टेक्निकल बाब असल्याचे सांगितले. पावसाळ्यात रबर मऊ पडतात व चालकाला रस्त्यातील खड्डय़ांचा अंदाज न आल्याने टायर आपटतात. बहुतांश वेळेस टायरमध्ये खडे अडकून राहिल्याने असे प्रकार घडतात, अशी सहज स्पष्टोक्ती उमरगा आगारप्रमुख एम. के. वाकळे यांनी दिली.
 
Top