मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यात यावीत. प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, निधीची उपलब्धता आदी कारणास्तव योजना रेंगाळल्या असल्यास संबंधीत अधिकाऱ्यांनी याबाबत पाठपुरावा करुन योजना गतिमान कराव्यात, असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. 
        सोपल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज त्यांच्या मंत्रालयीन दालनात याबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. कृषीमंत्री  राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विनंतीवरुन ही बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीस आमदार चंद्रशेखर घुले-पाटील, शेवगाव पंचायत समिती सभापती अरुण लांडे-पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता डॉ. हेमंत लांडगे, अहमदनगरचे कार्यकारी अभियंता जी. बी. सागू आदी मान्यवर उपस्थित होते. 
       दुष्काळी परिस्थिती संपली असली तरी अहमदनगर जिल्ह्यातील काही गावांना अजुनही टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. अहमदनगर जिल्हा कायमचा टँकरमुक्त करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावणे गरजेचे आहे. काही योजनांची कामे सध्या सुरु आहेत तर काही योजना या प्रशासकीय, तांत्रिक किंवा इतर प्रकारच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. संबंधीत अधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा करुन जिल्ह्यातील सर्व पाणीपुरवठा योजना मार्गस्थ कराव्यात, असे श्री. सोपल यावेळी म्हणाले.
           शेवगांव पाथर्डी आणि परिसरातल्या ५४ गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. तसेच शहर टाकळी आणि परिसरातील २८ गावांसाठीच्या योजनेचे नुतनीकरण केले जात आहे. या योजनांची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत, असे श्री. सोपल म्हणाले. याशिवाय शिर्डी परिसरातील लोणी बुद्रुक व खुर्द, आडगावसह परिसरातील इतर २ गावे, पिंपरी निर्मळ, वाढीव राहाता, विस्तारीत पुणतांबा योजना, पानोडी आणि इतर ९ गावांची योजना आदींचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (एमजेपी) केले जात आहे. एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी या योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे श्री. सोपल म्हणाले. पिंप्री लोकी अजमपूरची योजना तसेच औरंगपूर येथील पाणीपुरवठा योजनेचे काम जिल्हा परिषदेमार्फत होत आहे. या योजनांनाही गती द्यावी, असे त्यांनी सांगितले. 

 
Top