सोलापूर - सोलापूर-कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने रेल्वे प्रशासनाने रात्रीची वेळ निवडली. परंतु त्यालाही प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे सोलापूर विभागाने यावर शक्कल शोधली असून ही गाडी सकाळी कोल्हापूरहून सोलापूरला आल्यानंतर ती सोलापुरातील यार्डात थांबून न ठेवता पुढे हैदराबादपर्यंत (सिकंदराबाद) सोडण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. तसा प्रस्तावही सोलापूर विभागाने तयार केला आहे. या प्रस्तावास सोलापूर डीआरएमकडून मंजुरी मिळाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयाला पाठवून दिला जाईल. तेथून मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डकडे पाठवला जाईल. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास हैदराबादला जाण्यासाठी सोलापूरकरांची चांगलीच सोय होणार आहे.

असे आहे नियोजन
कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस ही सकाळी 7.40 वाजता सोलापूर स्थानकावर पोहोचते. त्यानंतर ती मेंटेनन्ससाठी यार्डात थांबते. रात्री 11 वाजता कोल्हापूरला रवाना होण्यासाठी पुन्हा स्थानकावर दाखल होते. जवळपास 15 तास ही गाडी सोलापुरातील यार्डात थांबते. त्याचा चांगला वापर करण्यासाठी सोलापूर विभागाने ही गाडी सोलापूरला आल्यानंतर थोडा मेटेंनन्स करून आठ ते साडेआठच्या सुमारास सिकंदराबादकडे सोडायचा प्रस्ताव तयार केला.
    ही गाडी सिकंदराबादला दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान पोहचून अर्ध्या तासाचा थांबा देऊन पुन्हा सोलापूरकडे येणार आहे. सोलापूरला आल्यानंतर ही गाडी पुन्हा कोल्हापूरला जाण्यासाठी सज्ज असेल, असे नियोजन केले गेले आहे.
   प्रस्ताव सध्या डीआरएम जॉन थॉमस यांच्याकडे विचाराधीन आहे. यास मंजुरी मिळताच पुढील मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठवला जाईल. सुशील गायकवाड, वरिष्ठ विभागीय दळण-वळण व्यवस्थापक

चौपाडमध्ये दर शुक्रवारी ‘मुश्किल आसान’ सेवा
‘मुश्किल आसान’ ही कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता आरक्षित तिकीट देणारी योजना आहे. गुरुवार व शुक्रवार हे दोन दिवस गाडी अक्कलकोट येथे थांबून होती. मात्र, तिथे फारसा प्रतिसाद लाभत नसल्याने गुरुवार एकच दिवस गाडी अक्कलकोटला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी गाडी अक्कलकोटला न थांबता सोलापुरातील चौपाड येथे पोस्ट ऑफिसजवळ सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत थांबणार आहे. प्रवाशांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.

शताब्दीला चांगला पर्याय
सकाळच्या वेळी सोलापूरकरांना सिकंदराबादला जाण्यासाठी शताब्दी एक्स्प्रेसवर अवलंबून राहावे लागते. त्याचे तिकीट दर अन्य रेल्वेच्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे काही जण साडेअकराच्या फलकनामा पॅसेंजरने सिकंदराबादला जातात. या नव्या गाडीमुळे सिकंदराबादला जाण्यासाठी सकाळच्या वेळी चांगली एक्स्प्रेस मिळेल. त्यामुळे सोलापूर, गुलबर्गा, वाडीच्या प्रवाशांची चांगली सोय होईल.

* साभार - दिव्यमराठी
 
Top