बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : आयकर विभागाचे अधिकार्‍यांनी केलेले सर्वेक्षण हे केवळ कागदपत्रांची तपासणी होती परंतु काही जणांनी लक्षात न आल्याने धाडी, छापे, रेड इत्यादी प्रकारच्या बातम्या प्रसिध्द केल्या ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे तसेच राजकिय द्वेषापोटी ज्यांनी माझ्या खोट्या तक्रारी दिल्या त्यांना मी १० जन्‍म पुरुन उरेन, असे बांधकाम व्यावसायिक राजेंद्र मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.
पुढे बोलताना मिरगणे म्‍हणाले, उस्‍मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मी सक्षङ्क उमेदवार असल्याने माझ्या आव्हानाला घाबरुन राजकीय सूडबुध्दीने खोट्या तक्रारी दिल्या. त्यामुळेच आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी माझ्या कार्यालयात कसून सर्वेक्षण केले. यामध्ये कोणत्याही प्रकारचे गैर आढळले नाही. माझा संपूर्ण व्यवहार हा चेकद्वारे असल्याने माझ्याकडे सर्व व्यवहारांचा जमा खर्चाचा पूर्णपणे हिशोब होता. या तीन दिवस तीन रात्रींच्या तपासणीत मला आणि माझ्या कर्मचार्‍यांना प्रचंड मानसिक त्रास झाला आहे. माझ्या फपाळवाडी, कासारवाडी, देवळाली इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा असल्याची माहिती तक्रारीत असल्याचे जाणवले. सदरच्या प्रकारानंतर मी माझे खरे रुप दाखवणार असून आजपर्यंत केवळ बचावाची भूमिका घेत होतो, यापुढे मी आक्रमण करणार आहे. माझ्यासारख्या प्रशासनातील अनुभवी व्यक्तीला ज्यांनी मला त्रास दिला त्यांना त्रास देणे मला खूप सोपे आहे. ज्यांनी तक्रारी दिल्या त्यांचे उत्पन्न तर सावकारी व्याजबट्‌ट्याचे असेल यापुढील काळात त्याचे परिणाम दिसून येतील व त्यांचेही काळेबेरे बाहेर काढू असेही राजेंद्र मिरगणे यांनी सांगितले.
 
Top