पांगरी :- बनावट शिधापत्रिका जवळ बाळगुन व इतर माध्यमातुन शासनाची पन्नास हजार रूपयांची फसवणुक केल्याप्रकरणी जिवनावश्यक वस्तु कायदा कलमान्वये अटक करण्‍यात आलेल्या वाणेवाडी (ता. बार्शी) येथील स्वस्त धान्य दुकानदारास न्यायमुर्ती व्ही.बी.मुल्ला यांच्या न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती पांगरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली.
    हनुमंत नारायण यादव असे दोन दिवसाची पोलिस कोठडी ठोठावण्‍यात आलेल्या आरोपीचे नांव आहे. त्यांनी मे ते ऑक्टोंबर या सहा महिन्यात अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्‍यात आला आहे. बार्शी तहसिल कार्यालयाकडे ग्राहकांच्या आलेल्या तक्रारी अर्जावरून तालुका पुरवठा निरीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी पथकांसह वाणेवाडी येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 116 चे चालक हुनमंत यादव यांच्या दुकानावर व घरावर अचानक छापे टाकुन तेथुन 28 बनावट शिधापत्रिका व स्‍वस्त धान्य दुकानासंदर्भातील सर्व दप्तर ताब्यात घेऊन चालक यादव यांनाही अटक केली होती. चौकशीत शासकीय गोडावुन मधुन शासनाच्या विविध योजनांमधील धान्य उचलण्‍यात आला असला तरी तो ग्राहकांना वाटप न करता बाजारपेठेत चढया दराने विकुन शासनाची फसवणुक केल्याचा निष्कर्ष पुरवठा विभागाने काढुन तसा सदर स्वस्त धान्य दुकानदाराने पन्नास हजार रूपयांचा अपहार केल्याबाबत पांगरी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. सापडलेल्या बोगस रेशनकार्डच्या अनुषंगाने तपास करण्‍यासाठी पांगरी पोलिसांनी पोलिस कोठडी मागितली होती. तालुका पुरवठा विभागाने अचानक धाडशी कारवाई केल्यामुळे बार्शी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमधुन खळबळ उडाली असुन प्रत्येकजण आपली तक्रार मामलेदार ऑफिसकडे जाणार नाही याची काळजी करताना दिसत आहेत. ऐन दिवाळीत झालेल्या या कारवाईमुळे आपले दप्तर अद्यावत करून घेन्यात दुकानदार व्यस्त झाले आहेत. अधिक तपास शरद मेमाणे हे करत आहेत.
 
Top