कळंब :  मुलींनी आपली ताकद दाखवून देणे काळाची गरज असून त्यांनी अन्याय सहन करू नये व अन्यायाची तडजोड करू नये, मुलगी हि दोन्ही घरचा दिवा असून 'नारी नरके समान है' असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यालयाच्‍या मुख्‍याध्‍यापिका श्रीमती भवर एम.एन. यांनी आंतरराष्‍ट्रीय बालिका दिनानिमित्‍त कार्यक्रमात केले.
    कळंब येथील पर्याय संस्था, हमारी बेटी अभियान व सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये आंतरराष्ट्रीय बालिका दिन मुख्याध्‍यापिका श्रीमती भवर एम. एन यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून पर्याय संस्‍थेचे समन्‍वयक आश्रुबा गायकवाड हे उपस्थित होते.
    आश्रुबा गायकवाड हे बोलताना म्हणाले की, १९ डिसेंबर २०११ रोजी संयुक्त राष्ट्र संघाने ११ अक्टोबर हा दिन आंतराष्ट्रिय बालिका दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. मुलींच्या शोषणाविरोधात संपूर्ण जगभरातून आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे, आज रोजी संपूर्ण जगात दहा करोड पेक्षाही जास्त मुली शिक्षणापासून वंचित आहेत. गरिबी संघर्ष भेदभाव व अन्याय अत्याचार आणि लैंगिक अत्याचाराच्या शिकार मुली होत आहेत. प्रत्येक तीन मुलीच्या मागे एक मुलगी आजही शाळेपासून वंचित आहे, असेही गायकवाड म्हणाले.
   या कार्यक्रमात विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी ज्ञानेश्वरी डीकले, अंकिता मते, श्वेता पाटील या विद्यार्थिनीनी आपले विचार मांडले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती ए.वाय. देवरे, बी.बी. राऊत, टी.जी. गोरे, जे.डी. ठाकूर, जे.एन. पठाण, श्रीमती एन.एम. म्‍हेत्रे, श्रीमती एस.व्‍ही. शिंदे, एस. एन. सावंत यांनी पुढाकार घेतले. यावेळी मीना राजू मंच, शालेय शिक्षण समितीचे सदस्य यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.ए.पाळवदे यांनी तर सूत्रसंचालन के.व्‍ही. मुंडे यांनी केले.
 
Top