बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : राजकारणी लोक मात्र एकदा आपल्या भूमिकेत गेले की अभिमन्यू होतात. त्यांना त्यातून परत भूमिका बदलता येत नाही, त्यांना दुसरा कोणताही उद्योग नसतो व यामध्ये अयशस्वी झालेली नाल पडलेल्या घोड्यासारखी ठेचकाळतांना दिसून येतात त्यांना झोपसुध्दा नीटपणे येत नाही, असे मत सोलापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. दिलीप सोपल यांनी व्यक्त केले.
     बार्शीत झालेल्या निमंत्रीतांच्या राज्यस्तरीय आनंदयात्री राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ना. सोपल हे बोलत होते. रविवारी दि. २९ रोजी सायंकाळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. ना. दिलीप सोपल यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदयात्री प्रतिष्ठानच्यावतीने बार्शीतील स्व.यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात सलग चार दिवस या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत राज्यभरातून ८२ संघांनी नांवे नोदविली. त्यापैकी २८ निवडक संघांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी सिनेअभिनेते पंढरीनाथ (पॅडी) कांबळे, धैर्यशील मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे निरीक्षक नागेश गारडकर, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, नगराध्यक्ष कादर तांबोळी, परिक्षक डॉ. दिलीप घारे, ज्ञानेश मुळे, गुरु वठारे, आर्यन सोपल, नागेश अक्कलकोटे, विलास रेणके आदी उपस्थित होते.
    ना. सोपल बोलताना पुढे म्हणाले, एकांकिकामध्ये नुसते करमणुकीचे विषय नाही तर त्यातून ताजे विषय त्यावरील भाष्य व डोळ्यात अंजन घालण्याचे काम हे कलाकार करत आहेत. यशवंतराव चव्हाण हे जर राजकारणात नसते तर फार ङ्कोठे साहित्यीक झाले असते, तिच परंपरा राजकिय लोक जपत आहेत. आनंदयात्री प्रतिष्ठानने या निमित्ताने बौध्दिक मेजवानी दिली असेही त्यांनी म्हटले.
    याप्रसंगी बोलतांना स्पर्धा परीक्षक डॉ. दिलीप घारे म्हणाले, कला ही अमूर्त गोष्ट असते, नवीन व्हिजन सादर करतांना ग्रामरसह प्रोजेक्शन अमूर्त करावे लागते. कला सादरीकरण करतांना पाच गोष्टी महत्वाच्या आहेत. शब्द, अर्थ, भाव, नाद आणि सांघीतीक सौंदर्य प्रत्येक शब्दाच्या लांबी, रुंदी, खोली, लवचिकता इत्यादींतून कला ही अमूर्त्य होते. कलाकारांनी आपले काय बरोबर आहे त्यापेक्षा काय चुकले याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कौतुकापेक्षा अप्रतिम झुंजण्याची ताकद, कल्पकता, भावार्थ, विषय, आकृतीबंध, समकालीन मूल्य ही काय आहेत त्याला महत्व असते. तुम्हाला काही मांडावे वाटते का हे देखिल बघावे लागते. नुसत्या आदरातिथ्यापेक्षा मनातील लहरी जुळून आत्‍मीयता असणे महत्वाचे असते आणि ते नाट्य कलाकारांना लवकर समजते.
    जितेंद्र आव्हाड म्हणाले, आजकाल ड्रॉईंग रुम, बेडरुमच्या टेबलावर पाय ठेऊन टिव्हीकडे पाहत राजकारण्यांना शिव्या देण्याचे छंद जोपासणारे उच्चभ्रू दिसून येत आहेत. परंतु सुदैवाने आणि त्यांच्या दुर्देवाने त्यांच्याशिवाय त्यांचे काहीच चालत नाही. आमच्यासारखा एकपात्री कोणाचा बाप करु शकत नाही. नाहीतर समाजाने आम्हाला केंव्हाच समाजाबाहेर फेकले असते. स्वत:चे दु:ख लपवून इतरांच्या चेहर्‍यावर आनंद आणि समाधानाचे हास्य निर्माण करणारा कलाकार असलेल्या दिलीप सोपल हे बार्शीतील असल्याने आपले भाग्य आहे. मनुष्य हा संवेदनशील आहे, त्याच्या चेहर्‍यावरुन, डोळ्यावरुन सुख आणि दु:ख दिसून येते परंतु दु:ख लपवण्याची ताकद ही अनेकांतून एकाची असते व ते अजब रसायन दिलीप सोपल हे होय. जीवनाच्या पटलावरचे नाट्य करता करता इतरांना कधीच वेदना होऊ नये हे पाहण्याचे काम सोपल यांनी केले आणि त्यांचे आनंदयात्री हे नाव ठेऊन बार्शीकरांनी त्यांना न्याय दिला आहे. तरुणाईच्या धुंदीची नशा ही त्या वयाला शोभते परंतु पुढच्या वयासाठी तीच मारकही ठरते. स्टेजवरील घडलेले कलाकार वेगळा ठसा उमटवतात असेही आव्हाड यांनी म्हटले.
    स्पर्धतील पारितोषिके मिळविलेले संघ व एकांकिका पुढीलप्रमाणे : सांघीक निकाल प्रथम - एमआयटी,पुणे (क ला काना का), द्वितीय - स्नेहस्मित, तळेगाव दाभाडे (ओळखलंत का सर?), तृतीय - मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महा.पुणे (भवरा), उत्तेजनार्थ - रंगसंगती कला मंच (नही तो गोली मार दूँगा), सोलापूर जिल्हा प्रथम - अविरंग थिएटर्स,सोलापूर (जोर का झटका), उत्कृष्ठ संहिता - योगेश सोमण (ओळखलंत का सर?, स्नेहस्मित), दिग्दर्शन प्रथम - साईनाथ गुणवाड (क ला काना का), द्वितीय - गौरव पोळ (भवरा), तृतीय - प्रणव जोशी (ओळखलंत का सर?, स्नेहस्मित), अभिनय पुरुष - प्रणव जोशी, द्वितीय रोहित जाधव, तृतीय रोहित माने, अभिनय स्त्री - प्रथम - पूर्वा वनपाल, द्वितीय - भाग्यश्री पाने, तृतीय - मधुरा पानसे, नेपथ्य प्रथम - दानिश नदाफ, द्वितीय - अजिंक्य माने, तृतीय-अमेय भालेराव, प्रकाश योजना प्रथम - अमोघ फडके, द्वितीय-शुभंकर सौंदणकर, तृतीय - अमोल देवकर, पार्श्‍वसंगीत प्रथम - सुमेघ चव्हाण, द्वितीय-अजिंक्य लिंगायत, तृतीय-गणेश कदम, रंग व वेशभूषा प्रथम-प्रियंका कदम, द्वितीय- कमलेश अडसूळ, तृतीय-मानसी गाडगीळ.
 
Top