उस्मानाबाद :- तुळजापूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने पंधरा दिवसांपासून अवैध गावठी दारूविरोधात मोहीम उघडली आहे. त्यामुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. या विभागाने रविवारी दि. 9 फेब्रुवारी रोजी कारवाई करून बोलेरो जीपसह 16 रबरी ट्युबमधील 1600 लिटर गावठी दारू जप्त करून दोघांना अटक केली.
    तुळजापूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या पंधरा दिवसांत दररोज छापे मारून शेजारच्या जिल्ह्यातून विक्रीसाठी येणारी गावठी दारू जप्त करून अनेकांवर गुन्हे दाखल केले. पंधरा दिवसांत जवळपास आठ मोटारसायकली व शेकडो लिटर गावठी दारू जप्त केली. यामुळे मोटारसायकलवर ट्युब टाकून दारू पुरवठा करणार्‍यांचे धाबे दणाणले. मात्र, दारू पुरवठादारांनी आपली दारू पुरवठय़ाची पद्धत बदलली. यामध्ये मोटारसायकलऐवजी मोठय़ा गाड्यांचा वापर करून दारू पुरवठा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, उत्पादन शुल्कच्या तुळजापूर येथील अधिकारी व कर्मचार्‍यांनी ही बाब हेरून रविवारी बोलेरो जीपमधून(एमएच 13 एएन 0647) विक्रीसाठी जात असलेली 1600 लिटर गावठी दारू 16 रबरी ट्युबमधून जप्त केली. यावेळी उमेश गणपत चव्हाण (बक्षी हिप्परगा, सोलापूर) व किरण माणिक जाधव (मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर) यांना ताब्यात घेतले.
 
Top