उस्मानाबाद :- नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटावे आणि त्यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेऊन उस्मानाबाद शहरात स्वच्छता मोहीम राबविली. स्वच्छतेचा हा जागर संपूर्ण जिल्ह्यात केला जाणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी सांगितले.
      काही दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी नगरपालिका क्षेत्रात भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळीच त्यांनी नगरपालिकेच्या अधिका-यांना शहरातील स्वच्छतेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. तुळजापूर येथून डॉ. नारनवरे  यांनी या स्वच्छता मोहिमेची सुरुवात केली. विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी आणि विविध शाळा-महाविद्यालये यांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या सहकार्याने ही मोहिम राबविली.
     जिल्हा परिषद यंत्रणेने आज निर्मल भारत अभियानांतर्गत या मोहिमेचा जोरदार जागर केला. सकाळी 8 वाजताच शिक्षण, आरोग्य यासंह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी जिल्हा परिषदेच्य़ा कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात दाखल झाले. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रावत यांनी हातात झाडू घेतला आणि सर्व सहकाऱ्यासह परिसर स्वच्छतेला सुरुवात झाली. पदाचा कोणताही अभिनिवेश न बाळगता शहर स्वच्छतेच्या ध्यासाने ही मोहिम राबविली गेली. सुरुवातीला शहर बसस्थानकात साफसफाई करण्यात आली. उपस्थित नागरिकांनाही आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
      तेथून परिसराची स्वच्छता करीत आणि त्या-त्या परिसरातील नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करीत अधिकारी-कर्मचारी-विद्यार्थी-शिक्षक हे छत्रपती शिवाजी महाराज चौक, ताजमहल टॉकीज, नगरवाचनालय, माऊली चौक, नेहरु चौक, देशपांडे स्टॅन्ड या भागातील परिसर स्वच्छता करण्यात आली. प्रत्येक नागरिकाने कचरा हा कचरापेटीतच टाकावा, आसपासच्या परिसरात उघड्यावर कचरा फेकू नये. त्यामुळे आजारांना निमंत्रण मिळते. निरोगी आयुष्यासाठी प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन डॉ. नारनवरे आणि रावत यांनी केले.
यावेळी डॉ. नारनवरे यांनी विविध दुकानदारांशीही संवाद साधला. दुकानाजवळ कचरापेटी ठेवा. तेथे येणाऱ्या नागरिकांनाही कचरा तेथेच टाकण्यास सांगा, कोणत्याही परिस्थितीत कचरा इतरत्र पडता कामा नये, असे डॉ. नारनवरे यांनी बजावले. तसे झाल्यास दंड करावा लागेल. त्यामुळे काळजी घ्या, असा सल्ला देण्यासही ते विसरले नाहीत.
श्रीमती रावत यांनीही या मार्गावरील रहिवाशांशी संवाद साधला. घरातील कचरा बाहेर कुठेही टाकू नका, असे आवाहन त्यांनी केले. परिसर स्वच्छतेची सुरुवात स्वताच्या घरापासून करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सुमारे दोन तासांहून अधिक काळ शहराच्या विविध भागात या मोहिमेच्या माध्यमातून परिसर स्वच्छता करण्यात आली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, निर्मल भारत अभियानाचे समन्वयक डॉ. शीतलकुमार मुकणे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. आर. हाश्मी, तहसीलदार सुभाष काकडे, नगरपरिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह विविध यंत्रणांच्या अधिकारी-कर्मचारी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.   ***
 
Top