उस्मानाबाद :- व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅसचा वापर करणा-या दुकानदार आणि आस्थापनांविरोधात कडक कारवाई करण्याची भूमिका जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी घेतली आहे. व्यावसायिक आस्थापनांची तपासणी मोहिम पुरवठा विभागाच्या साह्याने हाती घेण्यात येणार असून असे प्रकार आढळण्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, गॅस एजन्सीजनी ग्राहकांना गॅस सिलींडर घरपोच देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. 
       येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्ह्यातील गॅस एजन्सीधारकांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी घेतली. अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी राम मिराशे, वजन व मापे निरीक्षक यांच्यासह गॅस एजन्सीधारक उपस्थित होते.
       जिल्ह्यात अनेक व्यापारी आस्थापना दैनंदिन वापरासाठी व्यावसायिक गॅस सिलींडरऐवजी घरगुती वापराच्या गॅस सिलींडरचा वापर करीत असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे घरगुती गॅसधारकांना त्याचा तुटवडा भासू शकतो. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात अशा आस्थापनांची तपासणी मोहिम राबविण्याचे निर्देश त्यांनी पुरवठा विभागाला दिले. अशा प्रकारे घरगुती गॅस वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाईचा इशारा त्यांनी दिला.
       याशिवाय, शहरी भागातील गॅस एजन्सीधारक ग्राहकांना घरपोच गॅस सिलींडर देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. गॅस सिलिंडर सुरक्षितरित्या घरपोच देण्याची संबंधित गॅस एजन्सीजची जबाबदारी आहे. त्याबाबत टाळाटाळ होत असेल तर ग्राहकांकडून गॅस सिलींडर हाताळणी व वाहतूक करताना दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घरपोच गॅस सिलींडर देण्याबाबत टाळाटाळ करणाऱ्या एजन्सीजविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही डॉ. नारनवरे यांनी दिला.
        सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता महत्वाची आहे. त्यामुळे असुरक्षित गॅस सिलींडर वाहतूक टाळावी. ग्रामीण भागातील गॅस एजन्सीजनेही नागरिकांना घरपोच सेवा देण्याचे निर्देश डॉ. नारनवरे यांनी दिले.
      अपर जिल्हाधिकारी पाटील यांनी गॅस एजन्सीधारकांचे म्हणणे ऐकून घेतले. गॅस एजन्सीधारकांनी गॅस सिलिंडर नोंदणी व वापराबाबत जागरुकता निर्माण करावी. व्यावसायिक गॅस सिलिंडरधारकांची बैठक घेऊन त्यांना व्यावसायिक गॅस सिलिंडर वापराबाबत सूचना द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
    बैठकीला नळदुर्ग, कळंब, उमरगा, भूम, तुळजापूर, सास्तुर, उस्मानाबाद, वाशी, येरमाळा येथील गॅस एजन्सीधारक उपस्थित होते.
 
Top