उस्मानाबाद - जिल्ह्यात गारपीट तसेच अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. मात्र, यापूर्वीची शासनाकडून देणे असलेल्या रकमेबाबत प्रशासनाने तात्काळ मागणी करावी. त्यांना त्यासाठी निधी देण्यात येईल. सन २०१२-१३ पर्यंतचे सर्व थकीत पैसे देण्याचे निर्देश वित्त विभागाला दिले असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. पवार यांनी शुक्रवारी जिल्हास्तरीय यंत्रणांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, एस.टी. परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, गोदावरी खोरे पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार राहुल मोटे, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, माजी आमदार राणा जगजीतसिंह पाटील, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे यांच्यासह विविध यंत्रणांच्या प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धता, पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यासाठी केलेल्या उपाययोजना, चारा उपलब्धता, जिल्ह्यातील सिमेंट बंधाऱ्यांची सद्यस्थिती, राज्य शासनाने दिलेल्या निधीतून बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांची माहिती घेतली. याशिवाय, खरीप हंगामातील पीक पेरणी, खत उपलब्धता, बियाणे उपलब्धता आणि पीक कर्ज वाटप यांचाही श्री. पवार यांनी आढावा घेतला.
श्री. पवार म्हणाले की, जिल्ह्यात गारपीट व अवेळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रशासनाच्या मागणीप्रमाणे निधी दिला आहे. मात्र, सन २०१२-१३ या वर्षीपर्यंतची काही मागणी शासनाकडे प्रलंबित असेल तर तात्काळ पाठपुरावा करा. हा निधी देण्याचे निर्देश वित्त विभागाला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या खरीप पेरणीचा संदर्भ देत श्री. पवार म्हणाले की, बोगस बियाणेबाबतच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करा तसेच संबंधित बियाणे कंपन्याविरुद्ध कार्यवाहीचे निर्देशही त्यांनी कृषी विभागाला दिले.
पीक कर्ज वाटपाबाबत काही बँका हलगर्जीपणा करत असतील तर कडक भूमिका घ्या, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळाले पाहिजे, ही राज्य शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा नियोजन संदर्भात वार्षिक योजनेचाही त्यांनी आढावा घेतला. जिल्हा विकासासाठी असणारी ही रक्कम वेळेत खर्च झाली पाहिजे, अशा सूचना त्यांनी दिल्या. स्थानिक विकास निधी व इतर कामे तांत्रिक व प्रशासकीय मान्यता घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नावीन्यपूर्ण योजनेतून पोलीस विभागासाठी सीसीटीवी यंत्रणा घ्याव्यात आणि मह्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी ही यंत्रणा बसवावी, अशा सूचना त्यांनी केल्या. यामुळे कायदा व सुव्यवस्थेवरील मोठा भार हलका होऊन नियंत्रण करणे सोपे होत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत, नगरपालिका क्षेत्रासाठी असणारी लोकसंख्येची अट काढून टाकण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा विकासासाठी आवश्यक त्या गोष्टींची जरुर मागणी करा, त्यासाठी मदत केली जाईल. मात्र, ही कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यात बांधण्यात आलेले कोल्हापूरी बंधाऱ्यांचे लोखंडी दरवाजे आता तेथे नाहीत. याठिकाणी १ मीटर सिमेंट बांध घातले तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल. सोलापूर जिल्ह्याप्रमाणे येथेही कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शासनाने मागील थकबाकी असणाऱ्यांची वीज तोडू नये असे आदेश दिले आहेत. याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश श्री. पवार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. राज्य शासनाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत गेल्या काही महिन्यांपासून अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हास्तरीय यंत्रणांना दिले.
प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली. प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण योजनांची यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांना दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी श्री. घुगे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीरंग तांबे, शिल्पा करमरकर,अरविंद लाटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री श्री. पवार आणि उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
आज सकाळी ठिक ८-५० वाजता उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचे उस्मानाबाद विमानतळावर आगमन झाले. जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे, जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. पुणे जिल्ह्यातील माळीण गावात झालेल्या दुर्घटनेमुळे श्री. पवार यांनी संपूर्ण दौरा कार्यक्रमात पुष्पगुच्छ व हारतुरे स्वीकारले नाहीत.
 
Top