बार्शी (मल्‍लीकार्तून धारूरकर)  बालाघाटच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न आहे. पांगरी येथेही पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने या गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली काढणे गरजेचे आहे. उजनी जलाशयातून राखून ठेवलेल्या पंचवीस टी.एम.सी. पाण्यापैकी एक टी.एम.सी.पाणी उपलब्ध करुन पांगरी गावचा पाण्याचा प्रश्‍न निकाली काढून सुजलाम सुफलाम करु असे आश्वासन कॉंग्रेसचे उमेदवार सुधीर गाढवे यांनी दिले.
     पांगरी (ता.बार्शी) येथील शिवाजी चौकात आयोजीत केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत पाटील, मुरलीधर देशमुख, आबा धावारे, जीवनदत्त आरगडे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनिल अवघडे, संदिप अलाट, निखील मस्के आदी उपस्थित होते.   
    याप्रसंगी बोलतांना कामील काझी म्हणाले, पांगरी येथे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक उमेदवारांनी जाहीर सभा घेतल्या, यामध्ये गावच्या नागरीकांऐवजी गाड्या पाठवून इतर गावातून आयात केलेले नागरिक जास्त होते. जनतेने निवडून दिलेल्या उमेदवाराने जनतेचा नोकर असल्याप्रमाणे काम करणे गरजेचे आहे परंतु आपण जनतेचा मालक असल्याप्रमाणे स्वत:ची वाहवा करुन घेतली जाते. अनेक वर्षे सत्ता देऊनही पांगरी भागाचा विकास झाला नाही. नागरिकांच्या मनामध्ये दहशतीची भिती आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासाठी आपण कार्यकर्ता म्हणून अहोरात्र काम केले असून आपल्या खांद्यावर नाचविले आहे, परंतु मुस्लिम बांधवांना सतत कात्रीत ठेवण्याचे काम करुन विश्वासघात केला आहे. राऊत यांनी आयोजीत केलेल्या मुस्लिम समाजाच्या मेळाव्यातील दारु पिणार्‍यांची गर्दी होती तर माझ्यासोबत कॉंग्रेसला मत मागणारे मुस्लिम बांधव हे पाच वेळा नमाज पडणारे पवित्र आहेत. कॉंग्रेसच्या अनेक योजना या गरिबांसाठी चांगल्या प्रकारे राबविण्यात आल्या. यांनी भ्रष्टाचार्‍यांशी हातमिळवणी करुन सह्या करण्याचे काम केले. मलिदा मिळतो म्हणून भ्रष्टाचार दिसला तरी हरकत घेतली नाही. पंतप्रधान पदावर विराजमान झालेला व्यक्ती हा कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी म्हणून येणे आणि चोवीस चोवीस सभा घेणे ही राजकारणाची टिंगल आहे. सुनिल अवघडे म्हणाले, मागील आठ वर्षांपासून पांगरी गावातील रस्त्यांची दुर्दशा असतांना त्याकडे आजही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. पिण्याचे पाणी नाही, तरुणांच्या हाताला काम नाही, अशा प्रकारची अवस्था असतांना ६०-४० च्या राजकारणात स्वत:चा स्वार्थ साधण्याचे राजकारण होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक अक्कलकोटे आणि त्यानंतर कॉंग्रेसचे नगरसेवक पिसे यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे शहरात दहशतीचे सावट होते. व्यापार्‍यांना मोठी अडचण निर्माण झाली. अशा प्रकारची दहशत पुन्हा न होण्यासाठी निर्भयपणे मतदान करुन कॉंग्रेसला साथ द्यावी. काही उमेदवार हे मागील तीन वर्षांपासून निवडणुकांची तयारी करत होते तर कॉंग्रेसच्या उमेदवार सुधीर गाढवे यांना केवळ पंधरा दिवस प्रचारासाठी मिळाले आहेत.
 
Top