बार्शी -  कामगारांच्या विविध प्रश्‍नांसाठी शासनाने निर्माण केलेल्या लेबर ऑफिसमध्ये मागील दिड वर्षांपासून अधिकारीच उपलब्ध नसल्याने मंदिर आहे पण मूर्तीच नाही अशी अवस्था झाली आहे. कामगारांच्या विविध प्रश्‍नांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी बोलाविण्यात येते यामुळे त्यांना नाहक त्रास होत असल्याची खंत कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांनी व्यक्त केली.
    बार्शीतील लिंगायत बोर्डींग येथे आयोजित केलेल्या सोलापूर जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या सहाव्या द्विवार्षिक जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्य महासंघाचे कार्याध्यक्ष कॉम्रेड तुकाराम भस्मे, कॉम्रेड नामदेव चव्हाण, बी.एम.सलगर, कॉ. ए.बी.कुलकणी आदि उपस्थित होते.   
     या अधिवेशनात कर्मचार्‍यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. कामगारांच्या विविध प्रश्‍न व मागण्यांसाठी आंदोलनाचा निर्धार यावेळी करण्यात आला. संघटनेचा लाल बावटा ङ्गडकावून राष्ट्रपुरुषांचे प्रतिमापूजन करण्यात आले व विविध मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. कॉं.ठोंबरे म्हणाले, ज्या देशाच्या पंतप्रधानाच्या पाठीवरुन उद्योगपती जाहीरपणे हात फिरवतो त्यांच्याकडून कामगारांना न्याय मिळण्यासाठी कामगारांना मोठी आंदोलने करावी लागतील. यापुढील काळात आपला हक्काचा माणूस व आपला माणूस म्हणून कामगारांना सत्तेत बसविणे हाच आपला महागाई भत्ता आणि हाच आपला पगार व भत्ता असेल त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कामगारांची आंदोलने सुरु असतांना जिल्हाधिकार्‍यांना वेळ नाही, मामलेदारांना वेळ नाही, २० कामगारांना आंदोलन केल्याचा राग व्यक्त करुन कामावरुन काढून टाकले जाते. याप्रश्‍नावर लेबर ऑफिसरची अवस्था पोलिसाला चोर भित नसल्यासारखी झाली असल्याने असे लेबर ऑफिसरही आम्हाला नको आहेत. कामगारांना दुजाभावाची व अपमानास्पद वागणूक देतांना आम्ही पाकिस्तानात आहोत का असा प्रश्‍न पडत आहे. पंतप्रधानांच्या गंगा स्वच्छतेच्या काही सेकंदाच्या कामांचा एवढा गवगवा होत आहे परंतु आमचा कामगार हा गटारीत हात घालून स्वच्छता करणारा प्रामाणिक कर्मचारी आहे त्याच्या भाकरीच्या हातालाही त्याच घाणीचा वास येतो परंतु त्याच्या किमान गरजा व प्रश्‍नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. शौचालयासाठी मंगळसूत्र विकणार्‍या महिलेचे कौतुक होत आहे परंतु त्याहीपूर्वी वीस वर्ष पाठीमागे वळून पाहिल्यास छोटू वैद्य यांनी आयुष्यभर कॉम्रेडच्या संघटना वाढीसाठी हळूहळू स्वत:ची सर्व मालमत्ता विकली. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीनेही उरलेले मंगळसूत्रही पक्षाला अर्पण केले आहे. लाल बावट्याचे कामगार हे पूर्वीपासूनच इतरांना काहीतरी देणारे आहेत. गरिबांच्या मतावर श्रीमंताचे, भांडवलदारांचे सरकार सत्तेवर आहे. ग्रामपंचायत कर्मचारी आपला लढा स्थानिक पासून मंत्रालयापर्यंत लढा देणार आहे. त्याचाच भाग म्हणून सर्व कामगर संघटना एकत्रपणे दि.५ डिंसेंबर रोजी देशव्यापी अंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. याप्रसंगी बोलतांना कॉ तुकाराम भस्मे म्हणाले, यापुढील काळात कामगार विरोधात भांडवल धारजीण्या, धर्मांध सरकार हे ग्रामीण कामगारांचे कायदे मोडण्याच्या विचारात असल्याने त्या विरोधात बुलंद लढा उभा करा. कॉ. नामदेव चव्हाण म्हणाले, ग्रामपंचायत कर्मचारी ज्या पध्दतीने लढा देत आपल्या आर्थीक मागण्या पुर्ण करुण घेत आहे त्याच प्रमाणे इतर क्षेत्रातील श्रमिक वर्गाची एकजुट करण्यात पुढे यावे.
     या अधिवेशनात सौ पाटील, कोळपे, लंबे, रशीद इनामदार अशा पाच जणांच्या मंडळाची निवड करण्यात आली. यावेळी विविध ठराव मंजुर करण्यात आले पाथर्डी दलित हत्याकांडाचा धिक्कार करणारा व तेथील गुन्हेगारांना शिक्षा करा, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा विमा उतरवा, सर्व कर्मचार्‍यांना पेन्शन मिळाली पाहिजे, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना घरकुल योजना लागु करा हे मागणी करणारे ठराव एकमताने मंजुर करण्यात आले. अधिवेशनाचा पुढील काळात करायचा लढा हा भांडवलशाही व भटशाही विरोधात करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला. पंचावन्न जणांची जिल्हा कौंन्सिल निवडुण जिल्हा कार्यकारणी निवडण्यात आली. अधिवेशन यशस्वीतेसाठी आयटकच्या विविध संघटनांनी शुभेच्छा दिल्या. कॉ. बापु सुरवसे, तुपे, मस्के, यादव,अण्णा देवकाते, शौकत शेख, प्रविण मस्तुद, विनायक माळी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
 
Top