उस्मानाबाद- आंतरराष्ट्रीय अपंग दिनानिमित्त समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांचे संयुक्त विद्यमाने दि.3 व 4 डिसेंबर,2014 रोजी श्री तुळजाभवानी स्टेडियम,उस्मानाबाद येथे  जिल्ह्यातील अपंगाच्या विशेष शाळा/ कर्मशाळामधील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
    बुधवारी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲड कुलदिप कदम-पाटील हे राहणार आहेत  तर प्रमुख पाहूणे म्हणून खासदार रविंद्र गायकवाड, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेंद्र तावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, विधान परिषद सदस्य दिलीपराव देशमुख, आमदार सर्वश्री राणाजगजितसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले, राहूल मोटे, मधुकरराव चव्हाण. बसवराज पाटील,सतिष चव्हाण, विक्रम काळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर गुंड (गुरुजी), जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती  लता पवार, कृषि व पशुसवंर्धन सभापती बाबुराव राठोड, अर्थ व बांधकाम सभापती दत्तात्रय मोहिते, समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त  माधव वैद्य, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  बी.एन. उबाळे,  समाज कल्याण सभापती हरीष डावरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी एस.के.मिनगीरे यांची उपस्थिती राहणार आहे.
    या स्पर्धेमध्ये प्रवर्गनिहाय मुकबधीर 180, अस्थिव्यंग-136, मतिमंद-60, अंध-21 असे एकूण 397 स्पर्धेक सहभागी होणार आहेत. स्पर्धेचा कालावधी 2 दिवसाचा असून प्रवर्गनिहाय व वयोगट निहाय मुला-मुलींसाठी स्वतंत्र क्रीडा स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे. यामध्ये 25 मीटर भरभर चालणे, 50, 100,200 आणि 400 मीटर धावणे, व्हील चेअर रेस, व्हील चेअरवर बसून सॉफटबॉल थ्रो, गोळा फेक, लांब उंडी, स्पॉट जंप, बादलीत बॉल टाकणे, बुध्दीबळ, गोळाफेक, चित्रकला, रांगोळी आदी क्रीडा स्पर्धा होणार आहेत. सर्व क्रीडा स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त पदक मिळविणाऱ्या अपंगाच्या विशेष शाळेस गुणांकनानुसार सर्व साधारण विजेतेपद देऊन गौरविण्यात येणार आहे.
           बुधवार,दि.3 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यकमाचे उदघाटन पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी जे.टी.पाटील  हे राहणार आहेत.
           गुरुवार,दि.4 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता परितोषिक वितरण समारंभ होणार असून  अध्यक्षस्थानी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक डॉ.रुपाली सातपुते राहणार आहेत. या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमास जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घेण्याचे आवाहन संयोजनकांनी केले आहे.    
 
Top